विद्यार्थिनीच्या मृत्यूनंतर साताऱ्यात विद्यार्थी संघटनांचे आंदोलन तीव्र; प्रमुख मागण्यांवर ठाम

by Team Satara Today | published on : 05 September 2026


सातारा : महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या दुर्दैवी मृत्यूनंतर अखिल भारतीय विद्यार्थी परिषद आणि बजरंग दलाच्या वतीने पुकारण्यात आलेले आंदोलन दुसऱ्या दिवशीही सुरूच राहिले. प्रशासनाने काही उपाययोजनांची पूर्तता केली असली, तरी प्रमुख मागण्यांवर तोडगा न निघाल्याने संघटनांनी आक्रमक पवित्रा कायम ठेवला आहे.
​घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाने महिला वसतिगृहाच्या रेक्टरला तातडीने कार्यमुक्त करत नव्या रेक्टरची नियुक्ती केली आहे. तसेच वसतिगृहात जाळी आणि ग्रील बसवण्याचे काम वेगाने सुरू करण्यात आले आहे. यापूर्वीची चौकशी समिती बरखास्त करून प्राथमिक अहवाल पोलिसांकडे वर्ग करण्यात आला असून, संस्थास्तरावर नवी चौकशी समिती नेमून दोषींवर कारवाईचे आश्वासन दिले गेले आहे. महाविद्यालय प्रशासनाने पीडित कुटुंबीयांची भेट घेऊन संपूर्ण सहकार्याची हमी दिली आहे.
​मात्र, प्रशासनाची ही कारवाई अपुरी असल्याचा आरोप करत विद्यार्थी संघटनांनी प्राचार्य आणि वसतिगृहातील १४ सदस्यांच्या राजीनाम्याची मागणी लावून धरली आहे. यासह मृत विद्यार्थिनीच्या कुटुंबीयांना एक कोटी रुपयांची आर्थिक मदत द्यावी, वसतिगृहात २४ तास व्यावसायिक समुपदेशन केंद्र सुरू करावे आणि विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेसाठी ठोस यंत्रणा उभी करावी, या प्रमुख मागण्या मान्य झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्धार व्यक्त करण्यात आला आहे. या आंदोलनात महाविद्यालयीन प्रमुख राहुल राठोड, उपप्रमुख सिद्धार्थ सोनटक्के, विजय गाढवे आणि विभाग संघटक राहुल साळुंखे यांच्यासह मोठ्या संख्येने विद्यार्थी सहभागी झाले आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यात राष्ट्रीय पक्षाची शिकार; मोराचे मांस शिजवणाऱ्यास वनविभागाकडून बेड्या
पुढील बातमी
ध्वनी प्रदूषणाची तक्रार आल्यास नियमानुसार कारवाई : एसपी निखील पिंगळे

संबंधित बातम्या