सायलेन्सरचा ‘आवाज’ बंद; पोलिसांचा बुलडोझर अ‍ॅक्शन!

सातारा-कराडमध्ये ६७७ वाहनांवर कारवाई; २८१ मॉडिफाय सायलेन्सरचा चुराडा

by Team Satara Today | published on : 05 September 2026


सातारा : मॉडिफाय सायलेन्सरच्या कर्णकर्कश आवाजाने रस्त्यावर धुमाकूळ घालणाऱ्या वाहनचालकांना सातारा पोलिसांनी जोरदार दणका दिला आहे. सातारा आणि कराड शहरात एकाचवेळी राबविण्यात आलेल्या विशेष मोहिमेत वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्या तब्बल ६७७ वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. विशेष म्हणजे जप्त करण्यात आलेले मॉडिफाय सायलेन्सर पोलिसांनी थेट बुलडोझरखाली टाकून नष्ट केले. त्यामुळे ‘दंड भरून पुन्हा तोच प्रकार’ करणाऱ्यांना पोलिसांनी थेट इशाराच दिला आहे.

मॉडिफाय सायलेन्सर, प्रेशर हॉर्न, नियमबाह्य सायरन आणि फॅन्सी नंबर प्लेटचा वापर करून वाहतूक नियमांची पायमल्ली करणाऱ्यांवर पोलिसांनी लक्ष केंद्रित केले. सातारा वाहतूक नियंत्रण शाखा, जिल्हा वाहतूक शाखा आणि कराड शहर वाहतूक नियंत्रण शाखेच्या संयुक्त पथकांनी ही कारवाई केली.
कराडमधील विद्यानगर परिसरात जप्त केलेले मॉडिफाय सायलेन्सर बुलडोझरखाली चिरडून नष्ट करण्यात आले. साताऱ्यात पोवई नाका परिसरातही जप्त केलेल्या सायलेन्सरचा नायनाट करण्यात आला.
पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबविण्यात आली. अधिकाऱ्यांनी विविध पथकांच्या माध्यमातून कारवाईचे नियोजन केले.

कारवाईचा धडाका :
मॉडिफाय सायलेन्सर : २८१
फॅन्सी नंबर प्लेट : १७०
प्रेशर हॉर्न : १८३
नियमबाह्य सायरन : ४३
एकूण : ६७७ कारवाया

वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या तसेच नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम करणाऱ्या कर्णकर्कश आवाजाविरोधातील ही मोहीम पुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ट्रान्सफॉर्मर चोरांच्या मुसक्या आवळल्या; सातारा तालुका पोलिसांची मोठी कारवाई
पुढील बातमी
साताऱ्यात राष्ट्रीय पक्षाची शिकार; मोराचे मांस शिजवणाऱ्यास वनविभागाकडून बेड्या

संबंधित बातम्या