पुढील १० वर्षांत मुंबई झोपडपट्टीमुक्त करणार; महामुंबईचा चेहरामोहरा बदलणार- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

by Team Satara Today | published on : 04 September 2026


मुंबई : मुंबईच्या सर्वांगीण पुनर्विकासासाठी क्लस्टर पद्धतीने नियोजन करण्यात आले आहे. पुढील दहा वर्षांत मुंबई  झोपडपट्टीमुक्त करण्याचे उद्दिष्ट आहे. धारावी पुनर्विकास, म्हाडा वसाहतींचा पुनर्विकास तसेच बेस्टच्या आगारांचा आधुनिक पद्धतीने विकास यामुळे महामुंबईचा चेहरामोहरा बदलणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.
‘नरेडको' महाराष्ट्राच्या ‘चेंज ऑफ गार्ड’ कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी ‘नरेडको’ महाराष्ट्र नेक्स्टजेनचे नवनिर्वाचित अध्यक्ष रौनक बांदेलकर यांच्यासह रिअल इस्टेट क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
 मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की, ‘नरेडको’ने नेहमीच बांधकाम क्षेत्रातील सुधारणा, व्यवसाय सुलभता आणि संपूर्ण व्यावसायिक समुदायाच्या हिताला प्राधान्य दिले आहे. मुंबईच्या विकास आराखड्याच्या निर्मितीच्या वेळी नरेडको, एमसीएचआय, क्रेडाईसह बांधकाम क्षेत्रातील विविध संस्थांनी सरकारसोबत खांद्याला खांदा लावून काम केले. त्यातून मुंबईसाठी प्रगतिशील विकास आराखडा तयार झाला.
महाराष्ट्रातील विकासदर ८.८ %
देशाच्या पहिल्या तिमाहीतील विकासदर ७.८ टक्के असताना महाराष्ट्राने याच कालावधीत ८.८ टक्के विकासदर नोंदविला आहे. या विकासात रिअल इस्टेट क्षेत्राची महत्त्वपूर्ण भूमिका आहे असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
धारावी पुनर्विकासाला गती
मुंबईच्या विकासाचा पुढील टप्पा पुनर्विकासाचा आहे. क्लस्टर पद्धतीने मुंबईचा विकास करण्यात येत असून, धारावी पुनर्विकासाला सुरुवात झाली आहे. जानेवारी २०२९ पर्यंत धारावीतील १० हजार पुनर्वसन सदनिका तयार करण्याचे उद्दिष्ट असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.
त्याचबरोबर, म्हाडाच्या ५० वर्षांपूर्वी विकसित झालेल्या वसाहतींच्या पुनर्विकासाचीही मोठी गरज आहे. उपलब्ध भू-संपत्तीचा योग्य आणि अधिक कार्यक्षम वापर करून मुंबईचा नियोजित विकास करण्यात येत आहे. असेही ते म्हणाले.
२०४७ पर्यंत एमएमआरची अर्थव्यवस्था १.५ ट्रिलियन डॉलरची
मुंबई महानगर प्रदेशाचा विकास आराखडा २०४७ पर्यंत एमएमआरची अर्थव्यवस्था १.५ ट्रिलियन डॉलरपर्यंत नेण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आला आहे. एमएमआर, पुणे महानगर प्रदेश आणि नागपूर महानगर प्रदेशात पुढील पिढीचे शहरीकरण वेगाने होणार आहे.  एमएमआरमध्ये भारतातील सुमारे ६० टक्के डेटा सेंटर क्षमता विकसित होत असून, स्मार्ट मॅन्युफॅक्चरिंग, फ्रंटियर टेक्नॉलॉजी आणि डीप टेकचे परिसंस्थाही येथे विकसित करण्यात येणार आहेत. असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
बेस्ट आगारांचा मिश्र  वापरातून पुनर्विकास
मुंबईकरांची जीवनवाहिनी असलेल्या बेस्टच्या आगारांचाही आधुनिक पद्धतीने पुनर्विकास करण्यात येणार आहे. या आगारांमध्ये आधुनिक बस स्थानके, प्रवासी सुविधा, तसेच व्यावसायिक व निवासी विकासाबरोबरच संग्रहालये, क्रीडांगणे आणि मनोरंजनाच्या सुविधांचा समावेश असलेला मिश्र वापराचा विकास केला जाणार आहे. यामुळे बेस्टला उत्पन्नाचे नवीन स्रोत उपलब्ध होतील आणि मुंबईच्या शहररचनेतही मोठा बदल घडेल, असे त्यांनी सांगितले


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कराड पालिकेच्या जलशुद्धीकरण केंद्रात चोरट्यांचा डल्ला, चौकशी करण्याची भाजप नगरसेवकांची मागणी, मुख्याधिकारी प्रशांत व्हटकर यांना निवेदन

संबंधित बातम्या