सातारा : सातार्यातील तेली खड्डा येथे जडीबुडी विक्री करणार्याला लुटमार केल्याप्रकरणी जिल्हा न्यायालयात दोघांना १० वर्षाची शिक्षा सुनावण्यात आली. यश सुरेश शिंदे (वय २३, रविवार पेठ, सातारा), अक्षय मधुकर तुपे (वय २१, रा. शनिवार पेठ, सातारा) अशी आरोपींची नावे आहेत. अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश ४ थे एन.एम. जमादार यांनी शिक्षा ठोठावली.
सातार्यातील ही घटना दि. ११ जुलै २०२३ रोजी सायंकाळी घडली होती. तक्रारदार इंदलसिंग रतनसिंग चितोडीया (वय ४९) हे जडीबुटी औषध विक्री करणारे आहेत. तेली खड्डा येथे झुडपात लघुशंका करत असताना दोघांनी त्यांची गचुंडी पकडून खाली बसविले. कोयत्याचा धाक दाखवून खिशातील ५०० रुपये, मोबाईल आणि कानातील बाळ्या काढून घेतल्या. यामुळे गाेंधळ निर्माण झाला व परिसरातील लोक तेथे जमले. त्यावेळी आरोपींनी दहशत माजवत सर्वांना भिती दाखवत तेथून पळ काढला.
पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिस अधिकारी सुधीर मोरे व महिला पोलिस तपास अधिकारी सी. एस. मोटे यांनी तपास करुन न्यायालयात दोषारोपपत्र दाखल केले. सरकार पक्षाच्यावतीने ॲड. अनुराधा निंबाळकर यांनी युक्तिवाद केला. एकूण १० साक्षीदार तपासले. न्यायाधिशांनी आरोपींना १० वर्षे सक्तमजुरी व प्रत्येकी ५,००० रुपये दंडाची शिक्षा सुनावली.
सातार्यात जडीबुडी विक्री करणार्याची लुटमार केल्याप्रकरणी दोघांना १० वर्षाची शिक्षा; २०२३ मधील घटनेचा निकाल
by Team Satara Today | published on : 04 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा