अंतरवाली सराटी : मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी अंतरवाली सराटी येथे आमरण उपोषणाला बसलेल्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज सहावा दिवस होता. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारच्या वतीने मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, उद्योगमंत्री उदय सामंत, आमदार प्रसाद लाड आणि आमदार मकरंद पाटील यांच्या शिष्टमंडळाने अंतरवाली सराटी येथे भेट देऊन जरांगे यांच्याशी सकारात्मक चर्चा केली. या चर्चेनंतर राज्यभरातील मराठा बांधवांनी उद्यापासून (४ सप्टेंबर) कुणबी प्रमाणपत्रासाठी अर्ज करावेत, असे आवाहन मनोज जरांगे पाटील यांनी केले आहे. तर दुसरीकडे, अर्ज करताना प्रशासकीय अडचण आल्यास तात्काळ संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना भेटावे, असे आवाहन मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले.
'नातं, रक्ताचं नातं आणि कुळ' आधारावर अर्ज
शिष्टमंडळाशी प्रदीर्घ चर्चा झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले, हैदराबाद गॅझेटनुसार ज्या ५८ लाख कुणबी नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या आधारे मराठा समाजाने प्रमाणपत्रासाठी आणि व्हॅलिडीटीसाठी अर्ज सुरू करावेत. ज्यांच्या नोंदी सापडल्या आहेत, त्यांच्या कुटुंबातील सदस्यांनी 'नातं, रक्ताचं नातं आणि कुळ' या आधारे उद्यापासून रीतसर अर्ज दाखल करावेत, असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
ग्रामपंचायतींमध्ये ५ सप्टेंबरपर्यंत नोंदींची यादी, नोडल अधिकाऱ्यांची नेमणूक
या निर्णयाची प्रभावी अंमलबजावणी व्हावी यासाठी ५ सप्टेंबरपर्यंत प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये उपलब्ध कुणबी नोंदींची यादी प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती समोर आली आहे. तसेच प्रत्येक जिल्ह्यामध्ये कुणबी प्रमाणपत्र वाटप प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी स्वतंत्र 'नोडल अधिकारी' नियुक्त करण्यात येणार आहेत. प्रमाणपत्र मिळताना स्थानिक पातळीवर अडवणूक झाल्यास किंवा समस्या निर्माण झाल्यास मराठा बांधवांनी थेट जिल्हाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा, असे मंत्री राधाकृष्ण विखे पाटील म्हणाले.
मागण्या मान्य झाल्याशिवाय उपोषण मागे नाही
"मराठा समाजाच्या सर्व मागण्या मान्य झाल्याशिवाय मी उपोषण सोडणार नाही. एकनाथ शिंदे यांना जर मराठा समाजाला खरोखर साथ द्यायची असेल, तर त्यांनी मनापासून आणि ठोस भूमिका घेऊन साथ द्यावी," असे जरांगे यांनी स्पष्ट केले.
कुणबी प्रमाणपत्र देण्यास सरकार अखेर तयार ; अंतरवाली सराटी येथे मंत्र्यांची मनोज जरांगे यांच्याशी सकारात्मक चर्चा
by Team Satara Today | published on : 03 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा