तू डिजेच्या विरोधात बोलतो का? म्हणून सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद बापटांवर हल्ला; नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत मध्यस्थी केली

by Team Satara Today | published on : 03 September 2026


पुणे : आगामी गणेशोत्सवातील डीजे आणि ध्वनीप्रदूषणाविरोधात आवाज उठवणारे सामाजिक कार्यकर्ते विद्यानंद सुहास बापट यांच्यावर भरदिवसा टिळक रस्त्यावर अचानक हल्ला करून बेदम मारहाण करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. एका वृत्तवाहिनीला मुलाखत देत असताना हा प्रकार घडला असून, याप्रकरणी बापट यांच्या तक्रारीवरून विश्रामबाग पोलीस ठाण्यात अज्ञात इसमाविरुद्ध भारतीय न्याय संहितेच्या (BNS) विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांत दाखल प्रथम खबर अहवालानुसार (FIR), फिर्यादी विद्यानंद बापट (वय ३७, रा. नारायण पेठ, पुणे) हे हडपसर येथील एका खाजगी कंपनीत नोकरी करतात. आगामी गणेशोत्सवात डीजेमुळे होणाऱ्या ध्वनीप्रदूषणाविरोधात ते सातत्याने सोशल मीडियावर आपली भूमिका मांडत आहेत. २ सप्टेंबर रोजी एका वृत्तवाहिनीचे प्रतिनिधी यांनी फोन करून गणेशोत्सवातील ध्वनीप्रदूषणावर ३ सप्टेंबर रोजी सकाळी मुलाखत घेण्याचे निश्चित केले होते.
ठरल्याप्रमाणे, ३ सप्टेंबर रोजी सकाळी पावणेअकराच्या सुमारास बापट हे टिळक रस्त्यावरील बादशाही चौक येथे पोहोचले. तेथून टिळक स्मारक मंदिराच्या प्रवेशद्वाराबाहेरून पत्रकार आणि कॅमेरामन यांच्यासोबत त्यांची फिरती मुलाखत (Walk-through interview) सुरू झाली. प्रतिनिधी रस्त्यावरील नागरिकांच्या प्रतिक्रियाही नोंदवून घेत होते.
सकाळी ११:४५ वाजण्याच्या सुमारास ही मुलाखत सदाशिव पेठेतील महाराष्ट्र मंडळाजवळील महेश नागरी सहकारी बँकेसमोरील मोकळ्या जागेत पोहोचली. त्याच वेळी कॅमेरामनच्या मागून गुलाबी रंगाचा शर्ट घातलेला अंदाजे ३० ते ३५ वर्षे वयोगटातील एक अनोळखी तरुण अचानक पुढे आला. त्याने बापट यांची वाट अडवली आणि "तुम्ही पर्यावरणवादी असेच आहात, तू आमच्या गणेशोत्सवात अडथळा निर्माण करतो का, डिजेच्या विरोधात बोलतो का?" असा जाब विचारत अचानक हाताने मारहाण करण्यास सुरुवात केली. हल्ल्यादरम्यान आरोपीने अत्यंत अश्लील आणि घाणेरड्या शब्दांत शिवीगाळ करत "आता तुला मारूनच टाकतो, तू कसा जिवंत राहतो ते पाहतोच" अशी थेट जीवे मारण्याची धमकी दिली. तसेच "हा गणेश विरोधी आहे, नास्तिक आहे, गणपती बाप्पाबद्दल बोलतो आणि टीका करतो; याला अजून मारले पाहिजे, याला सुट्टी देणार नाही," असे ओरडत आरोपीने पुन्हा बापट यांच्या गालावर जोरदार चापट मारली.

नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत मध्यस्थी केली

अचानक सुरू झालेल्या या हल्ल्यामुळे परिसरात मोठी खळबळ उडाली. तेथील काही स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान दाखवत मध्यस्थी केली आणि बापट यांची हल्लेखोराच्या तावडीतून सुटका केली. यानंतर बापट यांनी तत्काळ बाजूला जाऊन पोलीस नियंत्रण कक्षाच्या 'डायल ११२' वर संपर्क साधून मदत मागवली. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी बापट यांना वैद्यकीय उपचारासाठी ससून सर्वोपचार रुग्णालयात नेले. तेथे उपचार घेतल्यानंतर बापट यांनी विश्रामबाग पोलीस ठाण्यात हजर राहून लेखी फिर्याद दिली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कोयना धरण ओव्हर फ्लो; धरणात १०५.२५ टीएमसी पाणीसाठा, मागील वर्षीपेक्षा यंदा १७ दिवस अगोदर धरण पूर्ण भरले
पुढील बातमी
राज्यातील १४२ सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या बदल्या

संबंधित बातम्या