चौकशीदरम्यान विद्यार्थिनीने उचलले टोकाचे पाऊल; वाय. सी. कॉलेजच्या वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून विद्यार्थिनीचा मृत्यू

by Team Satara Today | published on : 03 September 2026


सातारा : येथील यशवंतराव चव्हाण इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स (वाय. सी.) महाविद्यालयाच्या मुलींच्या वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावरून पडून १९ वर्षीय विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना बुधवारी रात्री घडली. श्रुती बिरामणे (वय १९, रा. महाबळेश्वर) असे मृत विद्यार्थिनीचे नाव असून, या दुर्दैवी घटनेमुळे महाविद्यालयीन परिसर आणि शहरात मोठी खळबळ उडाली आहे.
​श्रुती ही महाविद्यालयात फूड टेक्नॉलॉजीच्या द्वितीय वर्षात शिक्षण घेत होती आणि महाविद्यालयाच्याच मुलींच्या वसतिगृहात राहत होती. मिळालेल्या माहितीनुसार, वसतिगृहातील बाथरूममध्ये आक्षेपार्ह मजकूर लिहिल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर वसतिगृह समितीकडून संबंधित विद्यार्थिनींची चौकशी सुरू करण्यात आली होती. याप्रकरणी तिच्या पालकांनाही बोलवण्यात येणार होते. दरम्यान, चौकशी सुरू असतानाच श्रुती नजर चुकवून बाथरूमला जात असल्याचे सांगून वसतिगृहाच्या तिसऱ्या मजल्यावर गेली आणि तेथून ती खाली पडल्याचे समोर आले. गंभीर अवस्थेतील श्रुतीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यापूर्वीच तिचा मृत्यू झाल्याचे सांगण्यात आले.
​घटनेची वार्ता समजताच नातेवाईक आणि ग्रामस्थांनी सातारा जिल्हा रुग्णालयात गर्दी केली होती, ज्यामुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. सातारा शहर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला असून वसतिगृहातील अन्य विद्यार्थिनी व कॉलेज प्रशासनाकडून सविस्तर माहिती घेतली जात आहे. विद्यार्थिनीने नेमक्या कोणत्या दबावाखाली किंवा कारणांमुळे हे टोकाचे पाऊल उचलले, याचा अधिक तपास पोलीस करत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
वळसे येथून दुचाकीची चोरी; बोरगाव पोलीस ठाण्यात फिर्याद

संबंधित बातम्या