पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉन : शेंद्रे येथे दोन दिवसीय भव्य एक्स्पो; १० हजार धावपटूंची उपस्थिती

by Team Satara Today | published on : 02 September 2026


सातारा : सातारा रनर्स फौंडेशन आयोजित देशभरात लोकप्रिय असलेल्या पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनचे यंदा १५ वे वर्ष असून, या स्पर्धेचा भव्य एक्स्पो ४ आणि ५ सप्टेंबर २०२६ रोजी शेंद्रे येथील कै. अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुलात होणार आहे.
​रविवार, दि. ६ सप्टेंबर रोजी होणाऱ्या या मुख्य स्पर्धेत देशभरातील सुमारे १० हजार धावपटू सहभागी होणार असून, पुनित बालन ग्रुप (PBG) यंदाचे मुख्य प्रायोजक आहेत. या पार्श्वभूमीवर आयोजित एक्स्पोचे उद्घाटन शुक्रवार, दि. ४ सप्टेंबर रोजी दुपारी १२ वाजता श्रीमंत छत्रपती सौ. वेदांतिकाराजे भोसले यांच्या हस्ते व सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होईल. यावेळी अजिंक्यतारा कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे, सेक्रेटरी शैलेश ढवळीकर आणि खजिनदार राहुल घायताडे यांनी दिली.
​हा एक्स्पो शुक्रवारी सकाळी १० ते सायंकाळी ६ आणि शनिवारी सकाळी ९ ते सायंकाळी ६ या वेळेत खुला राहील. जर्मन हँगर तंत्रज्ञानाने उभारलेल्या संपूर्ण वातानुकूलित संकुलात स्पर्धकांना टी-शर्ट, रनिंग बिब आणि संगणकीकृत टायमिंग चिप असलेले रेस किट वितरित केले जाईल. किट ताब्यात घेण्यासाठी नोंदणीचा संदेश किंवा ई-मेल आणि ओळख व पत्त्याचा पुरावा म्हणून आधारकार्ड सादर करणे बंधनकारक असल्याचे संस्थापक अध्यक्ष डॉ. संदीप काटे यांनी स्पष्ट केले आहे.
​बाहेरगावाहून येणाऱ्या धावपटूंची गैरसोय टाळण्यासाठी स्थानिक सातारकर धावपटूंनी पहिल्याच दिवशी रेस किट ताब्यात घ्यावे, असे आवाहन रेस डायरेक्टर डॉ. अविनाश शिंदे व जॉईंट रेस डायरेक्टर डॉ. दीपक बनकर यांनी केले आहे. याशिवाय धावपटू व नागरिकांच्या सोयीसाठी राजवाडा बसस्थानक आणि शाहू स्टेडियम येथून दर तासाला एक्स्पो स्थळापर्यंत मोफत शटल बससेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. या क्रीडा महोत्सवाचा आनंद घेण्यासाठी स्पर्धकांसह सर्व सातारकरांनी एक्स्पोला भेट द्यावी, असे आवाहन संयोजन समितीच्या डॉ. आदिती घोरपडे, डॉ. पल्लवी पिसाळ, डॉ. अश्विनी देव, डॉ. रंजिता गोळे, भाग्यश्री ढाणे, डॉ. कविता बनकर, केतकी पंडित, श्रुती भंडारी व शिल्पा जाधव यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटण प्रांत कार्यालयातील त्या लाच प्रकरणाने सातारा महसूल विभाग गॅसवर; 'एसीबी'च्या पुढील कारवाईकडे जिल्ह्याचे लक्ष

संबंधित बातम्या