सातारा : यंदाचा गणेशोत्सव शांततेत, उत्साहात आणि सामाजिक सलोखा राखत पार पडावा, यासाठी सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या वतीने गणेश मंडळांच्या पदाधिकार्यांची बैठक घेण्यात आली. शांतता, शिस्त आणि सुरक्षितता’ या त्रिसूत्रीचा अवलंब करून गणेशोत्सव साजरा करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी केले.
राधिका रोडवरील वृंदावन मल्टीपर्पज हॉलमध्ये ही बैठक झाली. सातारा तालुका पोलीस ठाण्याच्या हद्दीतील गणेश मंडळांचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, कार्यकर्ते, पदाधिकारी, पोलीस पाटील, सरपंच तसेच तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बैठकीस महावितरणचे उपअभियंता विवेक पाटील, नायब तहसीलदार वैभव कदम, बांधकाम विभागाचे उपविभागीय अभियंता आंबेकर, धर्मादाय कार्यालयाचे निरीक्षक सुनील माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रहार पाटील, कारकून तुषार पोळ यांच्यासह विविध प्रशासकीय विभागांचे अधिकारी उपस्थित होते. संबंधित अधिकार्यांनी गणेश मंडळांना परवानगीसाठी आवश्यक कागदपत्रे, विविध उपयोजना आणि घ्यावयाची खबरदारी याबाबत मार्गदर्शन केले.
गणेश मंडळांनी अधिकृत नोंदणी व आवश्यक परवानग्या घेऊनच मंडप उभारावेत. मंडपामुळे रस्ता, फुटपाथ अथवा वाहतुकीला अडथळा निर्माण होणार नाही, याची दक्षता घ्यावी. स्वयंसेवकांची यादी तयार करून त्यांचे नाव, पत्ता, मोबाईल क्रमांक व छायाचित्र दर्शनी भागात लावावे, तसेच कार्यकर्त्यांनी ओळखपत्र अथवा बॅज वापरावेत, अशा सूचना पोलिसांनी दिल्या. सामाजिक संदेश देणारे देखावे आणि सामाजिक उपक्रम राबविण्यावर भर देण्यात आला. ध्वनिक्षेपकाचा वापर शासनाने निर्धारित केलेल्या वेळेत व ध्वनीमर्यादेतच करावा. अश्लील, आक्षेपार्ह अथवा धार्मिक भावना दुखावणारे कार्यक्रम, घोषणा, पोस्टर किंवा फलक टाळावेत, तसेच सोशल मीडियावर अफवा किंवा समाजात तेढ निर्माण करणारे संदेश व व्हिडिओ प्रसारित करू नयेत, असे आवाहन करण्यात आले.
सुरक्षेच्या दृष्टीने मंडपामध्ये सीसीटीव्ही कॅमेरे, अग्निशामक यंत्रणा आणि सुरक्षित विद्युत व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. संशयास्पद व्यक्ती अथवा वस्तू आढळल्यास त्याला हात न लावता तातडीने पोलिसांना माहिती द्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले. मंडपामध्ये डीजी सेट असल्यास त्याची सुरक्षित व्यवस्था करावी आणि पेट्रोल-डिझेलचा साठा सुरक्षित ठिकाणी ठेवावा, अशी सूचना देण्यात आली.
मिरवणुकीचा मार्ग व वेळ पोलिसांशी समन्वय साधून निश्चित करावा. परवानगीशिवाय मिरवणूक काढू नये. विसर्जनावेळी अनावश्यक वाहनांची गर्दी टाळावी, गुलाल, रंग व फटाक्यांमुळे नागरिकांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी. नदी, तलाव व विहिरीच्या ठिकाणी सुरक्षिततेची व्यवस्था करून प्रशासनाने निश्चित केलेल्या विसर्जनस्थळाचाच वापर करावा, असे पोलिसांनी सांगितले.गणेश मंडळाच्या परिसरात जुगार, मटका, दारू किंवा कोणत्याही बेकायदेशीर प्रकारांना थारा देऊ नये, तसेच मंडळातील वाद अथवा किरकोळ घटना स्वतःहून हाताळण्याऐवजी पोलिसांना माहिती द्यावी, असे आवाहन करण्यात आले. दर्शनासाठी येणार्या नागरिकांसाठी महिला व पुरुषांच्या स्वतंत्र रांगा करण्याच्या सूचनाही देण्यात आल्या.
दरम्यान, उपस्थित गणेश मंडळांच्या अडीअडचणी व शंकांचे निरसन करून त्यांना आवश्यक मार्गदर्शन करण्यात आले. या बैठकीस पाचशे गणेश मंडळांचे कार्यकर्ते, सरपंच, शांतता समिती सदस्य, पोलीस पाटील आणि तंटामुक्ती समितीचे अध्यक्ष उपस्थित होते.
गणेशोत्सव हा श्रद्धा, सामाजिक एकोपा आणि शांततेचा उत्सव आहे. त्यामुळे सर्व गणेश मंडळांनी कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवण्यासाठी पोलीस प्रशासनास सहकार्य करावे. शांतता, शिस्त व सुरक्षितता या त्रिसूत्रीचा अवलंब करून गणेशोत्सव उत्साहात आणि आनंदात साजरा करावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी केले.
ग्रामसुरक्षा दल सक्रिय करण्याचे व डॉल्बी बंदीचे ठराव घेण्याचे आवाहन
गणेशोत्सव काळात उच्च न्यायालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार ‘डॉल्बी’ बंदच राहण्यासाठी पोलिस यंत्रणा वरीष्ठ पातळीवरून प्रयत्न करत आहे. त्यासाठी गावोगावच्या ग्रामपंचायतींनी तसे ठराव पोलिस ठाण्यात सादर करावेत. तसेच गणेशोत्सव काळात सुरक्षितता अधिक प्रभावी करण्यासाठी प्रत्येक गावात ग्रामसुरक्षा दल स्थापन करून ते कार्यान्वित करावे, अशी महत्त्वपूर्ण सूचना देण्यात आली. प्रत्येक ग्रामसुरक्षा दलात किमान 10 ते 15 तरुणांचा सहभाग असावा. रात्रीच्या गस्तीदरम्यान टी-शर्ट, शिट्टी, लाठी व बॅटरी आदी आवश्यक साहित्य उपलब्ध ठेवावे, असेही सांगण्यात आले.