सातारा : फुलांच्या रंगांची मुक्त उधळण, हिरवाईने नटलेले डोंगर आणि धुक्याची मनमोहक चादर अशा निसर्गरम्य वातावरणात जागतिक वारसा स्थळ असलेल्या कास पठाराच्या फुलोत्सव हंगाम 2026 ला दिमाखात सुरुवात झाली. खासदार उदयनराजे भोसले यांनी या फुलोत्सवाचे उद्घाटन करून येथील शाश्वत विसर्ग पर्यटकांनी जबाबदारी जपावा, असे आवाहन त्यांनी केले.
वन विभाग, सातारा वन परिक्षेत्र सातारा-मेढा आणि कास पठार कार्यकारी समितीच्या वतीने आयोजित हंगामाच्या उद्घाटन सोहळ्यास खासदार उदयनराजे भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी त्यांनी कासच्या पर्यटनाबरोबरच पर्यावरण संवर्धनाचा मुद्दा अधोरेखित केला.
कास पठार हे सातार्याची केवळ पर्यटनाची ओळख नाही, तर आपल्या नैसर्गिक आणि जैवविविधतेच्या वारशाचा महत्त्वाचा भाग आहे. कास पाहण्यासाठी देश-विदेशातून पर्यटक येतात. त्यामुळे स्थानिकांना रोजगार मिळतो, व्यवसाय वाढतात आणि परिसरातील अर्थव्यवस्थेला हातभार लागतो, असे उदयनराजे भोसले यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.
पर्यटन वाढत असताना कासच्या नाजूक जैवविविधतेचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेण्याचे आवाहनही त्यांनी केले. कासचा निसर्ग आपण उपभोगण्यासाठी नव्हे, तर पुढील पिढ्यांसाठी जपण्यासाठी मिळालेला वारसा आहे. पर्यटकांनी पठारावरील फुले न तोडता, कचरा न करता आणि वन विभागाच्या सर्व नियमांचे पालन करून पर्यटनाचा आनंद घ्यावा, असे आवाहन त्यांनी केले.
कास पठाराचा निसर्ग, स्थानिकांचा वारसा आणि पर्यटनातून निर्माण होणार्या रोजगाराच्या संधी यांच्यात योग्य समतोल साधणे आवश्यक आहे. पर्यावरणाचे नुकसान न करता पर्यटनाला चालना देण्यासाठी शाश्वत आणि पर्यावरणपूरक पर्यटनाचा मार्ग स्वीकारला पाहिजे, अशी अपेक्षाही उदयनराजे यांनी व्यक्त केली.
उद्घाटन सोहळ्यास भाजपा सातारा लोकसभा संयोजक सुनील काटकर, सातारा नगरपरिषदेचे उपनगराध्यक्ष दत्तात्रय बनकर, रक्षक प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष सुशील मोझर, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, वनपरिक्षेत्र अधिकारी संदीप जोपाळे यांच्यासह वन विभागाचे अधिकारी-कर्मचारी, स्थानिक नागरिक व पर्यटक उपस्थित होते.
कासच्या निसर्गसौंदर्याला पर्यटकांची पसंती; संवर्धनाची जबाबदारीही आपलीच खा. उदयनराजे यांच्या हस्ते फुलोत्सव हंगामाचा शुभारंभ
by Team Satara Today | published on : 01 September 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा