फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; वर्षभरात जिल्हा आरोग्य यंत्रणेतील चार अधिकार्‍यांवर कारवाई

by Team Satara Today | published on : 31 August 2026


सातारा, ( प्रतिनिधी) : जिल्हा रुग्णालयाच्या अखत्यारितील अधिकारी-कर्मचार्‍यांवरील निलंबनाची मालिका सुरूच असून, आता डॉ. राजेंद्र रूपनवर प्रकरणी फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर यांनी निलंबित केले आहे. डॉ. रूपनवर यांच्या तक्रारीनंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी नेमलेल्या चौकशी समितीच्या निष्कर्षांचाही निलंबन आदेशात संदर्भ देण्यात आला आहे. या कारवाईमुळे वर्षभरात जिल्हा आरोग्य यंत्रणेतील चार वर्ग-एक अधिकार्‍यांसह आठ जणांवर निलंबनाची कारवाई झाली आहे.

डॉ. मदने यांच्या प्रशासकीय कार्यकाळातील गंभीर घटना, कनिष्ठ वैद्यकीय अधिकारी व कर्मचार्‍यांशी असंवेदनशील व कठोर संवाद तसेच सौजन्यपूर्ण वर्तनाचा अभाव आदी बाबी आदेशात नमूद करण्यात आल्या आहेत. या पार्श्वभूमीवर आरोग्य सेवा आयुक्तांनी महाराष्ट्र नागरी सेवा (शिस्त व अपील) नियम, 1979 मधील नियम 4 (1)(अ) मधील तरतुदीनुसार 30 ऑगस्ट रोजी डॉ. मदने यांच्या निलंबनाचे आदेश काढले.

फलटणचे वैद्यकीय अधिकारी डॉ. राजेंद्र रूपनवर यांनी शस्त्र परवान्यासाठी आवश्यक वैद्यकीय प्रमाणपत्राच्या प्रकरणावरून आपल्यावर दबाव आणल्याचा तसेच वरिष्ठांकडून त्रास होत असल्याचा आरोप केला होता. याप्रकरणी फलटण शहर पोलिस ठाण्यात गुन्हाही दाखल झाला. त्यानंतर डॉ. रूपनवर यांच्या तक्रारीवर जिल्हा शल्यचिकित्सकांनी चौकशी समिती नेमली होती. पुढे डॉ. रूपनवर यांनी डॉ. मदने यांच्यासह आरोग्य उपसंचालक डॉ. भगवान पवार यांच्यावरही हस्तक्षेप व त्रासाचे आरोप केले होते. या आरोपांबाबतची वस्तुस्थिती संबंधित चौकशी व कायदेशीर प्रक्रियेतून स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, 27 ऑगस्ट रोजी डॉ. रूपनवर यांनी मुंबईतील सायन परिसरातील हाय व्होल्टेज टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याने हे प्रकरण राज्यभर चर्चेत आले होते. त्यानंतर आता डॉ. मदने यांच्यावर निलंबनाची कारवाई झाल्याने फलटण उपजिल्हा रुग्णालयातील प्रशासकीय घडामोडींना गंभीर वळण मिळाले आहे. निलंबन काळात डॉ. मदने यांचे मुख्यालय जिल्हा रुग्णालय, सोलापूर निश्चित करण्यात आले असून त्यांना तातडीने कार्यमुक्त करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

दरम्यान, वर्षभरात तत्कालीन जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. युवराज करपे, तत्कालीन अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राहुल खाडे, स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. चांदसाब शिकलगार आणि आता डॉ. लीला मदने अशा चार वर्ग-एक अधिकार्‍यांवर विविध कारणांनी निलंबनाची कारवाई झाली आहे. याशिवाय एक लिपिक आणि तीन चतुर्थश्रेणी कर्मचारीही निलंबित झाले आहेत. त्यामुळे वर्षभरात चार वर्ग-एक अधिकार्‍यांसह एकूण आठ अधिकारी-कर्मचार्‍यांवर निलंबनाची कारवाई झाल्याने आधीच मनुष्यबळाच्या अडचणींशी झगडणार्‍या जिल्ह्याच्या आरोग्य यंत्रणेत एका पाठोपाठ होत असलेल्या या कारवायांमुळे आता सिव्हिल’च्या प्रशासकीय कारभाराचाही प्रश्न ऐरणीवर आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
ट्रान्सफॉर्मर लुटणार्‍या टोळीच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या;चार तालुक्यांतील 16 गुन्हे उघड, 4 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त
पुढील बातमी
साखरेचे दर वाढल्याने कारखान्यांनी दुसरा हप्ता जाहीर करावा; रयत क्रांती संघटनेचे प्रकाश साबळे यांची मागणी

संबंधित बातम्या