ट्रान्सफॉर्मर लुटणार्‍या टोळीच्या एलसीबीने आवळल्या मुसक्या;चार तालुक्यांतील 16 गुन्हे उघड, 4 लाख 75 हजारांचा मुद्देमाल जप्त

by Team Satara Today | published on : 31 August 2026


सातारा : शेतकर्‍यांच्या शेतातील वीजपुरवठ्याचा कणा असलेले महावितरणचे ट्रान्सफॉर्मर खांबावरून खाली पाडून त्यातील तांब्याच्या तारांवर डल्ला मारणार्‍या टोळीचा सातारा स्थानिक गुन्हे शाखेने पर्दाफाश केला. तांब्याच्या तारांसाठी ट्रान्सफॉर्मर उद्ध्वस्त करणार्‍या या टोळीने सातारा जिल्ह्यात धुमाकूळ घातल्याचे तपासात समोर आले असून, एक-दोन नव्हे तर तब्बल 16 चोर्‍यांचे गुन्हे उघडकीस आले आहेत.

या कारवाईत विशाल शरद पवार (वय 35, रा. तरडगाव, ता. फलटण), साहील ऊर्फ शक्तीमान ऊर्फ चुचन लेमन पवार (वय 22, रा. विटभट्टीजवळ, नीरा, ता. पुरंदर, जि. पुणे) आणि अदित लेमन पवार (वय 25, मूळ रा. नीरा, सध्या रा. पवाराची निगडी, ता. जि. सातारा) या तिघांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्याकडून 4 लाख 75 हजार 800 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

महावितरणच्या ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांना बाजारात मोठी किंमत मिळत असल्याने टोळीने थेट ट्रान्सफॉर्मरलाच लक्ष्य केले होते. रात्रीच्या अंधाराचा फायदा घेत ट्रान्सफॉर्मर खांबावरून खाली पाडायचा आणि त्यातील तांब्याच्या तारा काढून पसार व्हायचे, अशी त्यांची कार्यपद्धती असल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे. या प्रकारामुळे शेतकर्‍यांचा वीजपुरवठा खंडित होऊन त्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागत होते.

दरम्यान, 20 ऑगस्ट रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके यांना टोळीतील तिघे सातारा शहरातील बॉम्बे रेस्टॉरंट चौक परिसरात येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार पथकाने परिसरात सापळा रचला. पोलिसांची चाहूल लागताच तिघांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला; मात्र दबा धरून बसलेल्या पोलिसांनी त्यांना शिताफीने पकडले.

चौकशीत आरोपींनी पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीत ट्रान्सफॉर्मरमधील तांब्याच्या तारांची चोरी केल्याची माहिती दिली. त्यांना अटक करून चार दिवसांची पोलीस कोठडी घेण्यात आली. कोठडीतील चौकशीत आरोपींच्या गुन्हेगारी कारवायांचा पट उलगडत गेला आणि पुसेगाव, खंडाळा, शिरवळ व लोणंद पोलीस ठाण्यांच्या हद्दीतील एकूण 16 गुन्हे उघडकीस आले.

पोलीस अधीक्षक निखील पिंगळे आणि अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडुकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके, सहायक पोलीस निरीक्षक अभिजीत यादव, पोलीस उपनिरीक्षक परितोष दातीर यांच्यासह चंद्रकांत पुजारी, पोलीस अंमदार अतिश घाडगे, संतोष सपकाळ, विजय कांबळे, संजय शिर्के, शरद बेबले, लैलेश फडतरे, लक्ष्मण जगधने, प्रविण फडतरे, हणमंत भोसले, सुजित भोसले, अविनाश चव्हाण, स्वप्नील शिंदे, किरण जगताप, अजय जाधव, अमित झेंडे, अमित सपकाळ, अरुण पाटील, अमित माने, स्वप्नील कुंभार, मोहन पवार, ओंकार यादव, विशाल पवार, रोहित निकम, पृथ्वीराज जाधव, इरफान मुलाणी, महेश निर्मळ, संकेत निकम, शकुंतला सणस, आदिका वीर यांनी ही कारवाई केली आहे. कारवाईमधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचेनिखील पिंगळे, पोलीस अधीक्षक सातारा व डॉ. वैशाली कडुकर अपर पोलीस अधीक्षक सातारा यांनी अभिनंदन केले आहे. या कारवाईमुळे महावितरणच्या ट्रान्सफॉर्मर चोरीच्या वाढत्या घटनांना मोठा आळा बसण्याची शक्यता व्यक्त होत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कास पठारावर उद्यापासून रंगणार फुलांचा हंगाम; पर्यटनमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हंगामाचे उद्घाटन
पुढील बातमी
फलटणच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित; वर्षभरात जिल्हा आरोग्य यंत्रणेतील चार अधिकार्‍यांवर कारवाई

संबंधित बातम्या