सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयात कार्यरत असणारे डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी वरिष्ठांच्या जाचाला कंटाळून मुंबईतील सायन रेल्वेस्थानक परिसरात आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी प्रयत्नांची शर्थ करीत डॉ. रुपनवर यांचे प्राण वाचवले होते. दुर्दैवाने आज सकाळीच उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. गेल्या वर्षापासून वादग्रस्त ठरलेल्या फलटण उपजिल्हा रुग्णालयातील एकाच वर्षात दुसरा बळी गेल्यामुळे फलटण तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये खळबळ उडाली आहे.
गेल्या महिन्यामध्ये एका राजकीय पक्षाशी संबंधित असलेले काहीजण फलटण येथे फिटनेस प्रमाणपत्र काढण्यासाठी आले असतानाच त्यांनी कर्तव्यावर असलेल्या डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्यावर राजकीय दबाव टाकून फिटनेस प्रमाणपत्र देण्याची मागणी केली होती. मात्र डॉ. रुपनवर यांना याबाबत संशय आल्याने त्यांनी प्रमाणपत्र देण्यास नकार दिला होता. यानंतर चिडलेल्या संबंधितांनी डॉ. रुपनवर यांना शिवीगाळ तसेच धक्काबुक्की केली होती. डॉ. रुपनवर यांनी याबाबत वरिष्ठांकडे तक्रार केली होती. मात्र, संबंधित लोकांवर कारवाई होणे अपेक्षित असताना आरोग्य विभागातील वरिष्ठांनी त्यांच्यावरच कारवाई करीत त्यांचे वेतन रोखले होते. या कारवाईमुळे अस्वस्थ झालेल्या डॉ. रुपनवर यांनी सोशल मीडियावर वरिष्ठांनी केलेल्या पिळवणुकीबाबत व्हिडिओ प्रसारित करुन मला न्याय मिळाला नाही तर मी आत्महत्या करणार व आत्महत्येस जबाबदार असणार्या लोकांचीही त्यांनी त्यांच्या डायरीमध्ये नावे लिहिली होती. तसेच तळहातावर माझा संशयित मृत्यू झाल्यास जबाबदार व्यक्ती प्रसाद कोंडे-देशमुख असा लिहिलेला फोटोही सोशल मीडियावर व्हायरल झालेला होता.
डॉ. रुपनवर हे अतिशय प्रतिकूल परिस्थितीतून शिकून डॉक्टर झाले होते. त्यांची नियुक्ती फलटण येथील उपजिल्हा रुग्णालयात झाली होती. मात्र गेल्या काही वर्षांपासून फलटण उपजिल्हा रुग्णालय वेगवेगळ्या वादाचे केंद्रबिंदू बनलेले आहे. अशामध्येच दि. 27 रोजी डॉ. रुपनवर यांनी वरिष्ठांच्या व राजकीय व्यक्तींच्या जाचाला कंटाळून मुंबई येथे आत्महत्येचा प्रयत्न केला होता. मात्र, उपस्थित पोलीस आणि अग्नीशमन दलाच्या जवानांनी त्यांचा जीव वाचवला होता. यानंतर त्यांना अधिक उपचारासाठी रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. आज दि. 31 रोजी उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले.
डॉ. रुपनवर यांच्या निधनामुळे फलटण व त्यांचे मूळ गाव असलेल्या माळशिरस तालुक्यात एकच खळबळ उडाली असून अनेक लोकांनी फलटणकडे धाव घेतल्यामुळे फलटण शहरामध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. दरम्यान, डॉ. रुपनवर यांचे नातेवाईक त्यांचे पार्थिव मुंबई येथून घेवून फलटणच्या दिशेने येत असून जोपर्यंत न्याय मिळत नाही, तोपर्यंत त्यांचे पार्थिव उपजिल्हा रुग्णालयातून हलविणार नसल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. तसेच संबंधितांना तत्काळ अटक न झाल्यास डॉ. रुपनवर यांच्या पार्थिवावर उपजिल्हा रुग्णालयासमोरच अंत्यसंस्कार करण्याचा इशारा त्यांच्या नातेवाईकांनी दिला असल्याची माहितीही मिळत आहे.
वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने निलंबित
डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्या प्रकरणात फलटण उपजिल्हा रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांचे नाव समोर आल्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सकांनी यासंदर्भात चौकशी समिती नेमली होती. डॉ. रुपनवर यांच्या तक्रारीच्या अनुषंगाने चौकशी समितीला डॉ. मदने या दोषी आढळल्यानंतर त्यांच्यावर आजच निलंबनाची कारवाई करण्यात आली.
फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांची प्राणज्योत अखेर मालवली
नातेवाईक करणार उपजिल्हा रुग्णालयासमोरच अंत्यसंस्कार; फलटणमध्ये तणावाचे वातावरण
by Team Satara Today | published on : 31 August 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा