वाठार स्टे. : सातारा-लोणंद राज्यमार्गावर सोमवारी पहाटे भरधाव ट्रक थेट देऊर येथील एसटी बसस्थानकातील उपाहारगृहात शिरल्याने भीषण अपघात झाला. या अपघातात हॉटेलचे मोठे नुकसान झाले असून, आतील तरुण थोडक्यात बचावल्याने सुदैवाने जीवितहानी टळली.
लोणंदहून साताऱ्याच्या दिशेने जाणाऱ्या भरधाव ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने हा अपघात घडला. अनियंत्रित झालेला ट्रक थेट बसस्थानकातील उपाहारगृहावर आदळला. पहाटेच्या वेळी हॉटेलमध्ये असलेला तरुण या धडकेतून बालंबाल बचावला. देऊर हे परिसरातील मुख्य केंद्र असून येथे देवस्थान, शाळा आणि महाविद्यालये असल्याने दिवसभर प्रवाशांची मोठी वर्दळ असते. मात्र, अपघात पहाटेच्या सुमारास घडल्याने मोठी दुर्घटना टळली. हाच अपघात दिवसा गर्दीच्या वेळी झाला असता तर गंभीर परिस्थिती निर्माण झाली असती, अशी प्रतिक्रिया प्रत्यक्षदर्शींनी दिली. दरम्यान, सातारा-लोणंद मार्गावरील वाढते अपघात लक्षात घेता प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांमधून केली जात आहे.
भरधाव ट्रक देऊर बसस्थानकातील हॉटेलमध्ये घुसला; मोठा अनर्थ टळला
by Team Satara Today | published on : 31 August 2026
लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा