कोयना धरणातील पाणीसाठा 103.73 टीएमसी; पाण्याची आवक वाढल्यामुळे पाण्याचा विसर्ग सुरु, नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा

by Team Satara Today | published on : 30 August 2026


सातारा : कोयना धरण पाणलोट क्षेत्रात शुक्रवारी सायंकाळनंतर मुसळधार पावसाने हजेरी लावली आहे. धरणात सध्या 103.73 टीएमसी पाणी साठा झाला  आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी अवघ्या 1.52 टीएमसी पाण्याची गरज आहे. धरणातील पाण्याची आवक वाढल्यामुळे धरणाच्या पायथा वीजगृहातून आज रविवारी सकाळी 11 वाजता 1050 क्युसेक पाण्याचा विसर्ग कोयना नदी पात्रात सुरू केला आहे.

पावसाचा जोर कायम राहिल्याने धरणातील पाणी पातळी वाढू लागली आहे. त्यामुळे धरण व्यवस्थापनाने आज रविवारी सकाळी 11 वाजता धरणाच्या पायथा वीजगृहातून 1050 क्युसेक पाणी कोयना नदी पात्रात सोडण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. दरम्यान, पावसाच्या प्रमाणानुसार व धरणात येणाऱ्या पाण्याच्या आवकेनुसार धरणाच्या दरवाजातून केव्हाही कोयना नदी पात्रात पाण्याचा विसर्ग केला जाऊ शकतो, असेही कोयना धरण व्यवस्थापनाने कळविले आहे.

महाबळेश्वर परिसरातील पावसाची आकडेवारी अद्याप उपलब्ध झालेली नाही. दरम्यान, कोयना धरणातील पाणी साठ्यात काल सायंकाळी पाच वाजल्यापासून आज सकाळी आठ वाजेपर्यंत तब्बल 1.19 टीएमसी पाण्याची वाढ झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणी पातळी वाढली असून धरणातील पाणीसाठा सध्या 103.73 टीएमसी झाला आहे. कोयना धरणाची पाणी साठवण क्षमता 105.25 टीएमसी आहे. धरण पूर्ण क्षमतेने भरण्यासाठी केवळ 1.52 टीएमसी पाण्याची गरज आहे. 


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
भारतात मुस्लिम नकोत म्हणणारा हिंदू असूच शकत नाही; न्यूयॉर्कमधील कार्यक्रमात सरसंघचालक मोहन भागवत यांचे विधान

संबंधित बातम्या