प्रतापगंज पेठ परिसरात परवानगीविना डीजेचा दणदणाट; शाहूपुरी पोलिसांची धडक कारवाई

by Team Satara Today | published on : 29 August 2026


सातारा : शहरातील प्रतापगंज पेठ परिसरात परवानगी न घेता मोठ्या आवाजात डीजे सुरू ठेवल्याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी कारवाई केली. पोलिसांच्या सूचनेनंतरही आवाज कमी न केल्याने साउंड सिस्टिम ताब्यात घेण्यात आली. याप्रकरणी सुरज संजय कदम (वय 30, रा. खेड, ता. सातारा) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

प्रतापगंज पेठेतील मैदानासमोर शुक्रवारी रात्री मोठ्या आवाजात साउंड सिस्टिम सुरू असल्याची माहिती शाहूपुरी पोलिसांना मिळाली. त्यानंतर पोलिस पथकाने तत्काळ घटनास्थळी धाव घेतली. मोठ्या आवाजामुळे नागरिकांना त्रास होत असल्याचे निदर्शनास आल्यानंतर पोलिसांनी संबंधितांना ध्वनीची तीव्रता कमी करण्याच्या सूचना केल्या.

मात्र, पोलिसांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करून ध्वनिवर्धकाचा वापर सुरूच ठेवण्यात आल्याचे आढळून आले. पोलिसांनी परवानगीबाबत विचारणा केली असता आवश्यक परवानगी नसल्याचे स्पष्ट झाले. त्यानंतर पोलिसांनी ध्वनिवर्धक यंत्रणा बंद करून साउंड सिस्टिमसह संबंधित वाहने ताब्यात घेतली.

याप्रकरणी हवालदार दीपक पोळ यांच्या तक्रारीवरून सुरज कदम याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास हवालदार कदम करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
एसटी स्टँड परिसरात तरुणींचे मोबाईलमध्ये फोटो काढल्याप्रकरणी दोघांवर विनयभंगाचा गुन्हा

संबंधित बातम्या