सातारा : येथील एसटी स्टँड परिसरात बसलेल्या तरुणींकडे अश्लील नजरेने पाहून त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो काढल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना 28 ऑगस्ट रोजी सकाळी पावणेदहा वाजण्याच्या सुमारास सातारा एसटी स्टँड येथे घडली. याप्रकरणी एका खासगी कंपनीत नोकरी करणार्या 22 वर्षीय तरुणीने सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
फिर्यादीनुसार, संबंधित तरुणी व तिची मैत्रीण या एसटी स्टँड परिसरात बसल्या असताना आरोपी राजू तुकाराम पाटील (वय 50, रा. म्हसोबा विडणी, ता. उकेरी, जि. बेळगाव, सध्या रा. आमराई हॉटेल, सातारा) आणि सागर विष्णू सांबरेकर (रा. पोळगाव, ता. आजरा, जि. कोल्हापूर, सध्या रा. आमराई हॉटेल, सातारा) हे त्यांच्याकडे वारंवार अश्लील नजरेने पाहत होते. तसेच दोघांनी त्यांच्या मोबाईलमध्ये फोटो काढल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या प्रकारामुळे तरुणींना त्रास झाल्याने संबंधित तरुणीने पोलिसांत धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार दोन्ही आरोपींविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस हवालदार गुरव करीत आहेत.