साताऱ्यातील जुनी एमआयडीसी परिसरात जुन्या वादातून तरुणावर कोयत्याने हल्ला; दोघांवर गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 29 August 2026


सातारा : जुन्या वादाच्या कारणावरून दोघांनी मोटारसायकल आडवी मारून तरुणासह त्याच्या मित्राला मारहाण केली. यावेळी एकाने लोखंडी कोयत्याने तरुणाच्या पाठीवर तसेच त्याच्या मित्राच्या मनगटावर वार करून दुखापत केली. तसेच जीवे मारण्याची धमकी देत मोटारसायकलवर दगड मारून नुकसान केल्याची घटना घडली.

ही घटना 26 ऑगस्ट रोजी सायंकाळी आठ ते साडेनऊ वाजण्याच्या सुमारास जुनी एमआयडीसी परिसरातील भगवा कट्टा येथे घडली. याप्रकरणी शहाबान गणी शेख (वय 25, रा. राधिकानगर, विलासपूर, ता. सातारा) यांनी सातारा शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. फिर्यादी शेख हे त्यांचा मित्र विजय कारंडे याच्यासोबत मोटारसायकल क्रमांक एमएच-11-डीवाय-6800 वरून जात असताना जुन्या वादाच्या कारणावरून मोसिन खान व सनी खान यांनी त्यांची मोटारसायकल अडवली. त्यानंतर दोघांनी फिर्यादी व त्यांच्या मित्राला हाताने मारहाण करून धक्काबुक्की केली.

यावेळी विजय कारंडे यांनी, तुम्ही आम्हाला का मारता?’ असे विचारले असता आरोपींपैकी एकाने कमरेला असलेल्या लोखंडी कोयत्याने फिर्यादीच्या पाठीवर वार केला. तसेच विजय कारंडे यांच्या डाव्या हाताच्या मनगटाजवळ कोयत्याने मारून दुखापत केली. त्यानंतर जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. तसेच मोटारसायकलवर दगड मारून तिचे नुकसान करण्यात आल्याचे फिर्यादीत नमूद आहे.

याप्रकरणी मोसिन खान व सनी खान (रा. सत्वशीलनगर, संभाजीनगर, सातारा) यांच्याविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास महिला पोलीस हवालदार पवार करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
संगम माहुली येथील हॉटेलसमोर पार्क केलेली मोटारसायकल चोरीला; अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा
पुढील बातमी
एसटी स्टँड परिसरात तरुणींचे मोबाईलमध्ये फोटो काढल्याप्रकरणी दोघांवर विनयभंगाचा गुन्हा

संबंधित बातम्या