सातारा : छत्रपती घराण्याचे तेरावे वारसदार तथा सातार्याचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्याविषयी समाजमाध्यमांवर आक्षेपार्ह टिप्पणी करणार्या आठ जणांविरोधात सातारा शहर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्यानंतर वातावरण तापले आहे. येसूबाई फाउंडेशनचे संस्थापक सुहास राजेशिर्के यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे छत्रपती घराण्याची निंदा-नालस्ती करणार्यांचा खरपूस समाचार घेत जिभा आवरा; अन्यथा वादळ येईल!’ असा थेट इशारा दिला आहे.
सातारा ही छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची राजधानी आहे. अन्याय, जुलूम आणि अत्याचाराविरुद्ध छत्रपतींनी उभा केलेला स्वाभिमानाचा वारसा आजही सातार्याच्या मातीत जिवंत आहे. त्यामुळे छत्रपती घराण्याच्या वारसदाराविषयी सोशल मीडियावर गलिच्छ, अश्लाघ्य आणि अवमानकारक भाषा वापरण्याचे धाडस खपवून घेतले जाणार नाही, असे राजेशिर्के यांनी ठणकावले.
समाजमाध्यमांवरील स्वातंत्र्य म्हणजे स्वैराचार नव्हे, असा स्पष्ट इशाराही त्यांनी दिला. चेहरा लपवून कोणाचीही बदनामी करण्याचा अधिकार कोणालाही मिळालेला नाही. शब्दांची मर्यादा ओलांडणार्यांनी त्याचे कायदेशीर आणि सामाजिक परिणाम भोगण्यास तयार राहावे, असे त्यांनी सुनावले.
गोरगरीब, गरजू आणि संकटग्रस्तांसाठी धावून जाणारे उदयनराजे असंख्य नागरिकांच्या परिचयाचे आहेत. त्यामुळे त्यांच्या चारित्र्यावर किंवा व्यक्तिमत्त्वावर चिखलफेक करण्यापूर्वी संबंधितांनी हजारो समर्थकांच्या भावना आणि सातार्याच्या अस्मितेचा विचार करावा. शब्द हे दुधारी शस्त्र आहे; ते जपून वापरा, असा इशारा देत राजेशिर्के यांनी छत्रपती घराण्याचा अवमान करणार्यांविरोधात कायदेशीर लढा अधिक तीव्र करण्याचे आवाहन केले आहे.