कूपर बंगला ते कनिष्क हॉल रस्त्यावरच भरतोय 'ओपन बार'; साताऱ्यातील 'फळकुटांचा' उपद्रव रोखण्याची मागणी

by Team Satara Today | published on : 29 August 2026


सातारा : शहरातील सिम्बायोसिस हॉस्पिटल ते पुण्यशील सुमित्राराजे उद्यान दरम्यान नव्याने झालेल्या काँक्रीट रस्त्यावर अंधार पडताच मद्यपींचा अड्डा भरत असून, या मार्गावरून ये-जा करणाऱ्या नागरिकांना व रुग्णांना याचा प्रचंड मनस्ताप सहन करावा लागत आहे.

​कूपर बंगला, सिम्बायोसिस हॉस्पिटल ते पुण्यशील सुमित्राराजे उद्यान या मार्गावर नव्याने प्रशस्त सिमेंट काँक्रीटचा रस्ता तयार करण्यात आला आहे. शहरात एक सुंदर आणि महत्त्वाचा मार्ग म्हणून या रस्त्याकडे पाहिले जाते. मात्र, काही समाजकंटक आणि गुन्हेगारी प्रवृत्तीचे तरुण दुचाकी व चारचाकी वाहने झाडांखाली उभी करून ठाण मांडत आहेत. वाहनांवर मोठ्या आवाजात गाणी लावून धिंगाणा घालणे, उघड्यावरच 'ओपन बार' थाटून मद्यप्राशन करणे असे प्रकार या भागात राजरोसपणे सुरू आहेत. एखाद्या ज्येष्ठ नागरिकाने किंवा स्थानिकाने या प्रकाराला विरोध दर्शवला, तर त्यांना दमदाटी, शिवीगाळ आणि धक्काबुक्की करण्याचे प्रकारही घडत आहेत.

​या मार्गावर नामांकित रुग्णालये असल्याने गंभीर रुग्णांची नियमित ने-आण सुरू असते. मात्र, मद्यपींनी रस्त्यावरच बेशिस्तपणे वाहने उभी केल्यामुळे रुग्णवाहिकांना वाट मिळणे कठीण होते. संध्याकाळच्या सुमारास महिलांची ये-जा तसेच वॉकसाठी येणाऱ्या ज्येष्ठ नागरिकांची मोठी वर्दळ येथे असते; परंतु या मद्यपींच्या त्रासामुळे रस्त्यावरून चालणेही असुरक्षित बनले आहे. याशिवाय सुमित्राराजे उद्यानाच्या कठड्यावर बसून गुटखा खाणाऱ्या टवाळखोरांनी थुंकून परिसर विद्रूप केला आहे. मद्यपींकडून रस्त्यावरच मद्याच्या रिकाम्या बाटल्या आणि काचा फोडून फेकल्या जात असल्याने अपघाताची भीती निर्माण झाली आहे. त्यामुळे पोलिसांनी या उपद्रवी टोळक्यांचा तातडीने बंदोबस्त करावा, अशी जोरदार मागणी नागरिकांमधून केली जात आहे.

सातारा शहर पोलिसांनी गस्त वाढवण्याची गरज

​कूपर बंगला ते कनिष्क हॉल दरम्यान असलेल्या होमाई कूपर मार्गावर नव्याने बनलेल्या काँक्रीट रस्त्यावर टवाळखोर दिवसभर रेंगाळत असतात. त्यांच्या अस्ताव्यस्त उभ्या असलेल्या वाहनांमुळे मार्गावर वाहतूक कोंडीची समस्या गंभीर बनत चालली आहे. सायंकाळनंतर रस्त्यावर भरणाऱ्या 'ओपन बार'मुळे कायदा व सुव्यवस्थेचा मोठा प्रश्न निर्माण होण्याची भीती व्यक्त केली जात आहे. कोणताही अनुचित प्रकार घडण्यापूर्वी सातारा शहर पोलिसांनी या भागात नियमित गस्त वाढवून मद्यपी आणि टवाळखोरांवर कडक कारवाई करावी, असा सूर सर्वसामान्य सातारकरांमधून उमटत आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खा. उदयनराजेंविषयी सोशल मीडियावर अवमानकारक पोस्ट; समर्थकांचा पोलिस ठाण्यात ठिय्या, अखेर ८ जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या