सातारा : वाचन, ज्ञान, विवेक आणि सामाजिक प्रबोधनाची चळवळ पुढे नेणारे साहित्यवेल वाचन प्रसार चळवळीचे संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांना नाशिक येथील प्रभावती वैद्य नॉलेज अँड एम्पॉवरमेंट इन्स्टिट्यूटतर्फे ‘भीम ज्ञानयोद्धा’ सन्मानाने गौरविण्यात आले. १९ ऑगस्ट २०२६ रोजी हा सन्मान प्रदान करण्यात आला. प्रभावती वैद्य नॉलेज अँड एम्पॉवरमेंट इन्स्टिट्यूटचे अध्यक्ष अनिल नि. वैद्य,, माजी न्यायाधीश यांच्या स्वाक्षरीने हा सन्मान प्रदान करण्यात आला.
‘भीम ज्ञानयोद्धा’ ही केवळ सन्मानाची उपाधी नसून ज्ञान आणि विचारांच्या माध्यमातून समाजप्रबोधन करणाऱ्या व्यक्तिमत्त्वाची ओळख आहे. ‘भीम’ हे डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या ज्ञान, समता, न्याय, बंधुता आणि संविधाननिष्ठ विचारांचे प्रतीक; ‘ज्ञान’ हे शिक्षण, वाचन, चिकित्सक विचार आणि विवेकाचे माध्यम; तर ‘योद्धा’ म्हणजे अज्ञान, अविवेक आणि विषमतेविरुद्ध विचारांच्या बळावर सातत्याने लढणारा समाजप्रबोधक. या अर्थाने प्रा. डॉ. वाघमारे यांच्या कार्याला हा सन्मान विशेष महत्त्व प्राप्त करून देतो.
प्रा. डॉ. वाघमारे ३१ मे २०२६ रोजी सेवेतून निवृत्त झाले. मात्र, निवृत्तीनंतरही त्यांनी सामाजिक आणि वैचारिक कार्याची वाटचाल थांबवलेली नाही. आयुष्यभर मिळवलेले ज्ञान, अनुभव आणि विचार समाजाच्या उपयोगी पडावेत, या जाणिवेतून ते आजही तळमळीने जनजागृतीचे कार्य करीत आहेत. त्यामुळे त्यांची ओळख ‘विचारयात्री’ म्हणून निर्माण झाली आहे.
साहित्यवेल वाचन प्रसार चळवळीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांपासून ज्येष्ठ नागरिकांपर्यंत विविध घटकांना वाचनाशी जोडणे, पुस्तकांमधून ज्ञान मिळविण्यास आणि त्या ज्ञानाचे चिकित्सक आकलन करण्यास प्रवृत्त करणे, हे त्यांचे प्रमुख कार्य आहे. ‘वाचनातून ज्ञान, ज्ञानातून विचार; विचारातून विवेक, विवेकातून सम्यक आचार आणि सम्यक आचारातून सदाचारी समाज!’ हा त्यांच्या कार्याचा मूलविचार आहे.
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार हे त्यांच्या कार्याचे महत्त्वाचे अंग आहे. लेखक तथा माजी न्यायाधीश अनिल वैद्य यांच्या ‘उपवर्गीकरण, क्रीमीलेयर आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका’ या ग्रंथाच्या वितरण व प्रसारकार्यात प्रा. डॉ. वाघमारे यांनी सहकार्य केले. सामाजिक आणि वैचारिक प्रश्नांवर व्यापक जनजागृती व्हावी, या भूमिकेतून केलेल्या या कार्याची दखल घेऊन त्यांना ‘भीम ज्ञानयोद्धा’ सन्मान देण्यात आला.
पुस्तक वाचण्याचे आवाहन करण्यापलीकडे जाऊन वाचलेल्या विचारांचा जीवनाशी संबंध जोडणे, हा त्यांच्या कार्याचा केंद्रबिंदू आहे. ज्ञान हे केवळ वैयक्तिक प्रगतीचे साधन न राहता समता, माणुसकी, सामाजिक न्याय आणि जबाबदार नागरिकत्वाची जाणीव निर्माण करणारे माध्यम व्हावे, अशी त्यांची भूमिका आहे.
सेवानिवृत्तीनंतरही ज्ञानाची मशाल घेऊन समाजात विचार जागविणाऱ्या प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांच्या कार्याला मिळालेला ‘भीम ज्ञानयोद्धा’ सन्मान हा त्यांच्या वैयक्तिक गौरवाबरोबरच वाचन, विवेक, समता आणि सामाजिक बांधिलकीच्या विचारांचा गौरव ठरला आहे.