सातारा : रक्षाबंधनाचा सण म्हणजे भाऊ-बहिणीच्या प्रेमाचे आणि विश्वासाचे नाते अधिक घट्ट करणारा दिवस. याच भावनेतून सातारा तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी एमआयडीसी परिसरातील ‘माहेर’ या सामाजिक संस्थेतील निराधार महिलांसोबत रक्षाबंधन साजरे केले.
पोलीस निरीक्षक तांबे यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांनी आणि पोलीस ठाण्यातील अंमलदारांनी ‘माहेर’ संस्थेला भेट दिली. यावेळी संस्थेतील महिलांनी पोलिसांच्या मनगटावर राखी बांधून रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. पोलिसांनीही या भगिनींशी संवाद साधत त्यांना सणाच्या शुभेच्छा दिल्या.
रक्षाबंधनाच्या निमित्ताने पोलिसांनी घेतलेल्या या उपक्रमामुळे ‘माहेर’ संस्थेतील महिलांमध्ये आनंदाचे वातावरण निर्माण झाले. कुटुंबापासून दूर असलेल्या या महिलांना सणाच्या दिवशी आपुलकीचा आणि आधाराचा अनुभव मिळाला.
यावेळी पोलीस निरीक्षक निलेश तांबे यांनी सांगितले की, समाजातील प्रत्येक व्यक्तीला सुरक्षिततेसोबतच आपुलकीची गरज असते. पोलिसांचे काम केवळ कायदा आणि सुव्यवस्था राखण्यापुरते मर्यादित नसून गरजू व्यक्तींच्या पाठीशी उभे राहणेही महत्त्वाचे आहे. त्यामुळे ‘माहेर’मधील भगिनींसोबत रक्षाबंधन साजरे करण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी सांगितले.
या उपक्रमास पोलीस निरीक्षक तांबे यांचे कुटुंबीय, सातारा तालुका पोलीस ठाण्यातील अंमलदार तसेच ‘माहेर’ संस्थेचे पदाधिकारी उपस्थित होते. पोलिसांच्या या उपक्रमाचे नागरिकांकडून कौतुक करण्यात येत आहे.