पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधात दाखल गुन्हा मागे घ्या; सातारा पत्रकार संघाच्यावतीने पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 28 August 2026


सातारा : टीव्ही चॅनलचे पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधात दाखल असलेला पुणे पोलीस ठाण्यातील गुन्हा मागे घ्यावा, अशी मागणी सातारा पत्रकार संघाच्यावतीने करण्यात आली. सातारा पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांना त्याबाबतचे निवेदन देण्यात आले.

सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष हरीश पाटणे, पत्रकारांचे मार्गदर्शक विनोद कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली एसपी निखिल पिंगळे यांना वस्तुस्थिती सांगण्यात आली. चार दिवसांपूर्वी पत्रकार मंदार गोंजारी हे वार्तांकन करण्यासाठी पुणे येथील सीओईपी महाविद्यालयात गेले होते. त्यानुसार त्यांनी कॉलेजमधील विद्यार्थ्यांसोबत संवाद साधून प्रतिक्रिया जाणून घेतल्या. ही बाब महाविद्यालयाच्या निदर्शनास आल्यानंतर आकस भावनेने महाविद्यालयाच्यावतीने शिवाजीनगर, पुणे येथील पोलीस ठाण्यात मंदार गोंजारी यांच्या विरुध्द गुन्हा दाखल केला.

मंदार गोंजारी हे मूळचे सातारा जिल्ह्यातील आहेत. गेली अनेक वर्षे तटस्थपणे व प्रामाणिकपणे ते पत्रकारिता करत आहेत. वस्तुतः विद्यार्थ्यांनी धाडसाने मांडलेल्या प्रश्नांची दखल घेऊन त्यात सकारात्मक सुधारणा करणे अपेक्षित होते. मात्र पत्रकारावरच तक्रार दाखल करण्यात आला. ही अत्यंत दुर्दैवी बाब असून माध्यम स्वातंत्र्यावर घाला घालणारे आहे. यामुळे या प्रकरणाची प्रशासनाने गांभीर्याने दखल घेऊन विद्यार्थ्यांचे प्रश्न अतिशय सकारात्मकपणे स्वीकारून ते मार्गी लावावेत. तसेच पत्रकार मंदार गोंजारी यांच्याविरोधातील चुकीची तक्रार तातडीने मागे घ्यावी, अशी मागणी सातारा पत्रकार संघाच्या वतीने करण्यात आली.

यावेळी सातारा पत्रकार संघाचे अध्यक्ष विठ्ठल हेंद्रे, उपाध्यक्ष उमेश बांबरे, खजिनदार अमित वाघमारे, पदाधिकारी चंद्रकांत देवरुखकर, रिझवान सय्यद, मीना शिेंदे, डिजीटल मिडीयाचे अध्यक्ष प्रतीक भद्रे, विनित जवळकर, सिध्दार्थ लाटकर, रघुनाथ कुंभार उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
प्रवेशावेळी अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांकडून शैक्षणिक शुल्काची रक्कम आकारू नये - आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी गणेश इवनाते
पुढील बातमी
बेकायदा शस्त्र विक्रीप्रकरणी साताऱ्यात तडीपार तरुणाच्या मुसक्या आवळल्या; एलसीबीची कारवाई, 3.29 लाखांचा मुद्देमाल जप्त

संबंधित बातम्या