सातारा : सातारा शहराच्या ऐतिहासिक ओळखीशी घट्ट जोडलेल्या श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह महाराज ऐतिहासिक उद्यानाच्या विकासाला आता मोठा निधी मिळाला आहे. उद्यानाच्या पुनर्विकासासाठी राज्य शासनाने तब्बल पाच कोटी रुपयांच्या निधीला मंजुरी दिली असून, त्यामुळे अनेक वर्षांपासून अपेक्षित असलेल्या उद्यानाच्या कायापालटाचा मार्ग मोकळा झाला आहे.
नगर विकास विभागाच्या नगरपरिषदांना वैशिष्ट्यपूर्ण कामासाठी विशेष अनुदान’ योजनेंतर्गत हा निधी सातारा नगरपरिषदेला उपलब्ध होणार आहे. उद्यानाच्या सद्यस्थितीकडे लक्ष वेधत त्याच्या सर्वांगीण विकासासाठी नगरसेवक पंकज चव्हाण यांनी शासनाकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पत्रव्यवहार करून निधीची मागणी करण्यात आली होती. त्यानंतर संबंधित विभागांकडे केलेल्या पाठपुराव्याला अखेर यश आले आहे.
मंजूर निधीतून उद्यानाचे ऐतिहासिक महत्त्व अबाधित ठेवत आधुनिक सुविधांची उभारणी करण्याचे नियोजन आहे. यामध्ये आकर्षक सुशोभीकरण, दर्जेदार वॉकिंग ट्रॅक, मुलांसाठी खेळाचे क्षेत्र, नागरिकांसाठी बैठक व्यवस्था, हरित क्षेत्राचा विकास तसेच अन्य आवश्यक नागरी सुविधांचा समावेश असणार आहे. विकासकामांसाठी स्वतंत्र आराखडा तयार करण्यात येणार आहे.
प्रतापसिंह महाराज उद्यान हे केवळ विरंगुळ्याचे ठिकाण न राहता सातार्याचा इतिहास, पर्यावरण आणि नागरिकांच्या मनोरंजनाचा केंद्रबिंदू बनविण्याचा प्रयत्न असल्याचे पंकज चव्हाण यांनी सांगितले.
निधी मंजूर केल्याबद्दल त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसेच उपमुख्यमंत्री व नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांचे आभार मानले. दीर्घकाळ रखडलेल्या उद्यानाच्या विकासासाठी मोठी आर्थिक तरतूद झाल्याने सातारा शहरातील नागरिकांमधून समाधान व्यक्त होत आहे.