सातारा : फलटण उपजिल्हा रुग्णालयातील डॉ. राजेंद्र रुपनवर यांनी मुंबईतील सायन रेल्वे स्टेशन परिसरात मोबाईल टॉवरवर चढून आत्महत्येचा प्रयत्न केल्याच्या घटनेने सातारा जिल्ह्यातील आरोग्य प्रशासनाच्या कारभारावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. रुग्णालयातील कामकाजातील हस्तक्षेप, वरिष्ठांचा दबाव आणि प्रशासकीय त्रासाबाबत तक्रार करूनही चौकशी समितीने अद्याप अहवाल सादर न केल्यानेच डॉक्टरांना टोकाचे पाऊल उचलावे लागले, असा आरोप सातारा जिल्हा महिला कॉंग्रेसच्या अध्यक्षा सुषमा राजेघोरपडे यांनी केला.
डॉ. रुपनवर यांनी जुलै 2026 मध्ये आत्महत्येची धमकी देत सुसाईड नोट लिहिली होती. त्यानंतर त्यांच्या तक्रारीची चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आली. मात्र, अद्याप चौकशी अहवाल समोर आलेला नाही. या पार्श्वभूमीवर आज त्यांनी आत्महत्येचा प्रयत्न केल्याने आरोग्य प्रशासनाच्या कार्यपद्धतीबाबत संताप व्यक्त होत आहे.
सरकार आणि जिल्हा आरोग्य प्रशासन दुसर्या डॉ. संपदा मुंडे होण्याची वाट पाहत आहे का? असा संतप्त सवाल सुषमा राजेघोरपडे यांनी जिल्हाधिकार्यांमार्फत राज्य सरकार आणि आरोग्य प्रशासनाला केला. डॉ. रुपनवर यांच्या तक्रारीची तातडीने आणि कोणत्याही दबावाशिवाय निष्पक्ष चौकशी करण्यात यावी. चौकशीला विलंब होत असताना त्यांच्या जीवाचे बरेवाईट झाल्यास त्याची संपूर्ण जबाबदारी राज्य सरकार, जिल्हा आरोग्य प्रशासन आणि चौकशी समितीची राहील, असा इशाराही त्यांनी दिला.
दरम्यान, क्रांतिसिंह नाना पाटील जिल्हा रुग्णालय, सातारा येथे गेल्या पाच महिन्यांपासून पूर्णवेळ जिल्हा शल्यचिकित्सक नसून प्रभारी अधिकार्यांच्या माध्यमातून कारभार सुरू आहे. त्यामुळे प्रशासकीय निर्णय रखडत असून नागरिकांच्या कामांवरही परिणाम होत असल्याचा आरोप कॉंग्रेसने केला आहे. जिल्हा रुग्णालयाला तातडीने पूर्णवेळ जिल्हा शल्यचिकित्सक नियुक्त करावा, अशी मागणीही करण्यात आली.
या दोन्ही मागण्यांवर एका आठवड्यात कार्यवाही न झाल्यास पुढील गुरुवारी सातारा जिल्हा रुग्णालयासमोर कॉंग्रेस पक्षातर्फे सरकारची तिरडी’ उचलण्याचे तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशारा राजेघोरपडे यांनी दिला.
गेल्या पाच महिन्यांपासून जिल्हा शल्यचिकित्सकाची पूर्णवेळ नियुक्ती करता येत नाही, रुग्णालयातील गंभीर तक्रारींकडे गांभीर्याने पाहिले जात नाही आणि अखेर एका डॉक्टरला आत्महत्येचा प्रयत्न करण्याची वेळ येते. हे आरोग्य प्रशासनाच्या संवेदनशीलतेवर प्रश्नचिन्ह आहे. सरकारने या मृत अवस्थेतून बाहेर येऊन तातडीने निर्णय घ्यावेत, अशी घणाघाती टीका त्यांनी केली.
यावेळी महिला कॉंग्रेसच्या उज्वला सुतार, नाजनीन फकीर, मीना जगदाळे, तबस्सुम मुल्ला यांच्यासह पदाधिकारी उपस्थित होते.