सातारा : नेपाळमधील महापुरात अनेकांचा मृत्यू झाला असून काही पर्यटक अडकल्याची भीतीही व्यक्त होत आहे. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्ष स्थापन करण्यात आला असून सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरच्या १० महिला पर्यटनासाठी गेल्या होत्या. त्या पोखरा येथील एका हाॅटेलमध्ये सुरक्षित आहेत. त्यांच्याशी प्रशासनाचा संपर्क झालेला आहे.
नेपाळमधील रसुवा जिल्ह्यात भोटे कोशी नदीला महापूर आला आहे. यामुळे जनजीवन विस्कळीत झाले असून, या आपत्तीच्या पार्श्वभूमीवर विविध देशांतील पर्यटक व नागरिकांच्या सुरक्षिततेबाबत माहिती संकलित करण्याचे काम सुरू झाले आहे. सातारा जिल्हा प्रशासनही अलर्ट मोडवर काम करत आहे. यासाठी जिल्ह्यातील कोणी पर्यटक नेपाळमध्ये पूरस्थितीमुळे अडकले आहेत किंवा ज्यांचा कुटुंबीयांशी संपर्क होत नाही त्यांच्या नातेवाईकांनी तत्काळ सातारा जिल्हाधिकारी कार्यालयातील नियंत्रण कक्ष येथे संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आलेले आहे.
पर्यटकांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न
नेपाळमध्ये अडकलेल्या पर्यटकांची माहिती प्रशासनाला देताना संबंधित व्यक्तीचे नाव, मोबाइल क्रमांक, नेपाळमधील सध्याचे ठिकाण/हॉटेल, प्रवासाचा तपशील आणि कुटुंबीयांचा संपर्क क्रमांक उपलब्ध असल्यास तो द्यावा. त्याचबरोबर सातारा जिल्ह्यातील नागरिकांनी घाबरून न जाता अधिकृत माहितीसाठी जिल्हा प्रशासनाशी संपर्क साधावा. आपत्तीग्रस्त भागातील नागरिक आणि पर्यटकांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक ती माहिती व समन्वय साधण्याचे प्रयत्न प्रशासनामार्फत करण्यात येत आहेत, अशी माहितीही प्रशासनाकडून देण्यात आली आहे.