कराडात गांजा विक्री करणाऱ्या दोघांना अटक; १ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त, चार दिवसांची पोलीस कोठडी

by Team Satara Today | published on : 27 August 2026


कराड : कराड शहरातील बसस्थानक परिसरात गांजा विक्रीसाठी आलेल्या दोघांना पोलिसांनी छापा टाकून अटक केली. या कारवाईत पोलिसांनी तब्बल १.३८० किलो गांजा, मोटारसायकल आणि तीन मोबाईल असा एकूण १ लाख ७९ हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला.

या प्रकरणी कराड शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये यासीर कादर शिकलगार (वय २३, रा. मंगळवार पेठ, कराड) आणि आकाश राजू वाघमारे (वय २६, रा. शनिवार पेठ, कराड) यांचा समावेश आहे. दोघांना न्यायालयात हजर केले असता चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली.

२५ ऑगस्ट रोजी रात्री कराड शहर पोलिसांना कराड बसस्थानक परिसरात दोघे गांजा विक्रीसाठी येणार असल्याची गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार सहायक पोलीस निरीक्षक विजय गोडसे यांच्या पथकाने सापळा रचला. रात्री सुमारे ११.१५ वाजता बसस्थानक परिसरातील सहारा लॉजजवळील मोकळ्या जागेत मोपेड ॲॅक्सेस गाडीवरून गांजा विक्रीसाठी आलेल्या संशयितांवर पोलिसांनी छापा टाकला. त्यांच्या ताब्यातून ६९ हजार रुपये किमतीचा १.३८० किलो गांजा जप्त करण्यात आला.

ही कारवाई पोलीस अधीक्षक निखील पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडूकर, उपविभागीय पोलीस अधिकारी राजश्री पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक दीपक वाघमारे करीत आहेत.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
खंडाळा-किसनवीरच्या भागीदारी करारास मिळणार मुदतवाढ : ना. मकरंद पाटील, सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांच्या दालनात महत्त्वपूर्ण बैठक
पुढील बातमी
राज्यातील साखरेची कृत्रिम टंचाई रोखण्यासाठी सरकार अ‍ॅक्शन मोडवर; प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी विशेष तपासणी मोहीम, ४०० मेट्रिक टनांपेक्षा जास्त साठ्यावर बंदी

संबंधित बातम्या