सातारा : नेपाळमध्ये निर्माण झालेल्या भीषण पूरपरिस्थितीमुळे सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर येथील १० महिला पर्यटक पोखरा शहरात अडकल्या आहेत. सुदैवाने या सर्व महिला सुरक्षित असून त्या एका हॉटेलमध्ये मुक्कामी असल्याची माहिती समोर आली आहे. सातारा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन विभाग आणि पालकमंत्री कार्यालयाने त्यांच्याशी थेट संपर्क साधला असून त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी प्रशासकीय पातळीवर हालचाली सुरू झाल्या आहेत.
पर्यटनासाठी नेपाळ दौऱ्यावर गेलेल्या महाबळेश्वरमधील या महिला सध्या पोखरा भागात आहेत. नेपाळमधील अनेक भागांत अतिवृष्टीमुळे नद्यांना महापूर आला असून जनजीवन विस्कळीत झाले आहे. पूरपरिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन प्रशासनाकडून पुढील पर्यटन तातडीने थांबवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. पूरग्रस्त मुख्य भागापासून पोखरा शहर सुरक्षित अंतरावर असल्याने या महिला एका हॉटेलमध्ये सुखरूप आहेत. सातारा जिल्हा प्रशासन व आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा सातत्याने या पर्यटकांच्या संपर्कात असून, पूरस्थितीचा आढावा घेत त्यांना लवकरात लवकर आणि सुरक्षितपणे मायदेशी परत आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत.