पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या जर्मन हँगर एक्स्पो मंडप उभारणीचा शानदार शुभारंभ; ४ व ५ सप्टेंबरला शेंद्रे येथे भरणार एक्स्पो

by Team Satara Today | published on : 26 August 2026


सातारा : सातारा रनर्स फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात येणाऱ्या १५ व्या पीबीजी सातारा हिल हाफ मॅरेथॉनच्या पूर्वसंध्येला भरवण्यात येणाऱ्या भव्य मॅरेथॉन एक्स्पोच्या मंडप उभारणीचा शुभारंभ अजिंक्यतारा सहकारी साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक जिवाजी मोहिते यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून करण्यात आला.

शेंद्रे येथील अजिंक्यतारा कारखान्याच्या अभयसिंहराजे भोसले सांस्कृतिक संकुलात येत्या ४ आणि ५ सप्टेंबर रोजी हा दोन दिवसीय एक्स्पो रंगणार आहे. यावर्षी देशभरातून १० हजारांहून अधिक धावपटू मॅरेथॉनसाठी दाखल होणार असून, त्यांच्या स्वागतासाठी जर्मन हँगर या अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून भव्य आणि संपूर्ण वातानुकूलित मंडप उभारला जात आहे. धावपटू तसेच क्रीडाप्रेमींना सुरक्षित व प्रशस्त वातावरण मिळावे या उद्देशाने आर्किटेक्ट उपेंद्र पंडित यांनी या मंडपाचे विशेष डिझाइन केले असून, उभारणीची जबाबदारी भाऊ भोसले व जितेंद्र भोसले यांनी स्वीकारली आहे. या एक्स्पोमध्ये देशभरातील नामांकित संस्था आणि कंपन्यांचे क्रीडा, रनिंग, फिटनेस व आरोग्याशी संबंधित विविध स्टॉल्स असणार आहेत.

मंडप उभारणीच्या शुभारंभप्रसंगी मॅरेथॉन संयोजन समितीचे अध्यक्ष आर्किटेक्ट उपेंद्र पंडित, उपाध्यक्ष विशाल ढाणे, सेक्रेटरी शैलेश ढवळीकर, सातारा रनर्स फाउंडेशनचे संचालक अभिषेक भंडारी, अजिंक्यतारा कारखान्याचे सांस्कृतिक विभाग प्रमुख व ज्येष्ठ पत्रकार महेंद्र जाधव, भाऊ भोसले यांच्यासह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान, मॅरेथॉनपूर्व उत्साहाचे वातावरण निर्माण करणाऱ्या या भव्य एक्स्पोला सातारकरांनी आणि धावपटूंनी मोठ्या संख्येने भेट द्यावी, असे आवाहन रेस डायरेक्टर डॉ. अविनाश शिंदे, जॉईंट रेस डायरेक्टर डॉ. दीपक बनकर, उपाध्यक्ष विशाल ढाणे, सेक्रेटरी शैलेश ढवळीकर आणि खजिनदार राहुल घायताडे यांनी केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
राज्यातील सर्व शासकीय, खासगी, धर्मादाय रुग्णालयांचे सुरक्षा ऑडिट होणार; आरोग्य संस्थांचे फायर ऑडिट करून अहवाल सादर करा- आरोग्यमंत्री

संबंधित बातम्या