सातारा : नगरपरिषदेच्या जिन्यात पोलिसांसमोरच राडा केल्याप्रकरणी दोन जणांविरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, सातारा नगरपरिषदेच्या इमारतीत मुख्याधिकारी कक्षाकडे जाणार्या जिन्यात दोन व्यक्तींमध्ये हाणामारी झाल्याने खळबळ उडाली. 24 ऑगस्ट रोजी सायंकाळी सव्वापाचच्या सुमारास ठेकेदार श्रीकांत राठोड आणि सतीश बबनराव लेवे यांच्यात वाद झाला. त्याचे रूपांतर मारामारीत झाले.
यावेळी सतीश लेवे याने श्रीकांत राठोड यांच्या कानाखाली मारल्याचे पोलिसांच्या फिर्यादीत नमूद आहे. पोलिसांच्या उपस्थितीत सार्वजनिक ठिकाणी गोंधळ झाल्याने दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पोलीस हवालदार महेंद्र पाटोळे यांच्या फिर्यादीवरून कारवाई करण्यात आली असून, तपास पोलीस हवालदार त्रिंबके करीत आहेत.