सातारा : सैदापूर येथील प्रतिमा एम्पायरमधील बँकेने सील केलेल्या मालमत्तेत परवानगीशिवाय पुन्हा प्रवेश केल्याप्रकरणी दाम्पत्याविरुद्ध सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, प्लॉट क्रमांक 402, सी विंगमधील तिसर्या मजल्यावरील मालमत्ता कुंदन राजाराम तडाखे यांनी बँक ऑफ बडोदाकडे तारण ठेवली होती. कर्जाचे हप्ते थकल्यानंतर बँकेने कायदेशीर प्रक्रिया करून मालमत्ता सील केली होती.
मात्र, तडाखे आणि त्यांच्या पत्नीने सील तोडून घरात प्रवेश करून तेथे वास्तव्य सुरू केल्याचे निदर्शनास आले. बँकेचे चीफ मॅनेजर मणिनाथ बलदेव दुबे यांच्या फिर्यादीवरून दाम्पत्याविरोधात सातारा तालुका पोलिसांत गुन्हा दाखल झाला आहे. तपास सहायक फौजदार सी. बी. माने करीत आहेत.