जिल्हा परिषदेतील अधिकारी, कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिर; २३२ जणांची आरोग्य तपासणी

by Team Satara Today | published on : 25 August 2026


सातारा : महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभागामार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ या उपक्रमांतर्गत सातारा जिल्हा परिषदेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांसाठी विशेष आरोग्य तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले. जिल्हा परिषद अध्यक्षा सौ. प्रिया शिंदे व उपाध्यक्ष तथा सभापती, आरोग्य समिती राजूभैया भोसले यांच्या संकल्पनेतून आयोजित या शिबिराला अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.

महिला विभागाचे उद्घाटन अध्यक्षा सौ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते, तर पुरुष विभागाचे उद्घाटन उपाध्यक्ष राजू (भैया) भोसले यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलिपे, सहाय्यक जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. प्रमोद शिर्के, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुनील चव्हाण, वैद्यकीय अधिकारी डॉ. लीना बेंडाळे यांच्यासह आरोग्य विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

शिबिरात दीर्घकालीन मूत्रपिंडाच्या आजारासाठी UACR टेस्ट, गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग, उच्च रक्तदाब, हिमोग्लोबीन, ईसीजी, मधुमेह आदी तपासण्या करण्यात आल्या. कृष्णा मेडिकल कॉलेज, कराड आणि सिव्हिल हॉस्पिटल, सातारा येथील तज्ज्ञ डॉक्टर व आरोग्य कर्मचाऱ्यांनी तपासणी केली.

या शिबिरात १४५ पुरुष व ८७ महिला अशा एकूण २३२ अधिकारी-कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तपासणीनंतर संबंधितांना आवश्यक आरोग्यविषयक मार्गदर्शन तसेच पुढील उपचाराबाबत सल्ला देण्यात आला.

या उपक्रमामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये स्वतःच्या आरोग्याबाबत जागरूकता वाढविण्यासोबतच ‘प्रतिबंधात्मक आरोग्य तपासणी’चे महत्त्व अधोरेखित झाले. आरोग्य विभागाच्या वतीने आयोजित या शिबिराला मिळालेला प्रतिसाद पाहता जिल्हा परिषद प्रशासनाच्या आरोग्यविषयक सकारात्मक दृष्टिकोनाला बळ मिळाले आहे.

अधिकारी-कर्मचारी निरोगी आणि सक्षम राहावा

“ दैनंदिन कामकाजाच्या व्यापात अधिकारी-कर्मचारी अनेकदा स्वतःच्या आरोग्याकडे दुर्लक्ष करतात. काही आजारांची लक्षणे सुरुवातीला जाणवतही नाहीत. त्यामुळे नियमित आरोग्य तपासणी, आजाराचे वेळेत निदान आणि आवश्यक उपचार यांना विशेष महत्त्व आहे. आपल्या जिल्हा परिषद कुटुंबातील प्रत्येक अधिकारी-कर्मचारी निरोगी आणि सक्षम राहावा, हा या शिबिरामागील प्रमुख उद्देश आहे. तसेच आरोग्य तपासणी म्हणजे आजार शोधणे नव्हे, तर आजारापासून स्वतःचा बचाव करण्याची पहिली पायरी  ”

 डॉ.  प्रिया शिंदे,अध्यक्ष, सातारा जिल्हा परिषद , सातारा

 अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे

“अनेक आजार शरीरात असतात; मात्र त्याची जाणीव संबंधित व्यक्तीला नसते. नियमित आरोग्य तपासणीमुळे अशा आजारांचे वेळीच निदान होऊन पुढील गंभीर धोका टाळता येतो. ‘माझे गाव, आरोग्य संपन्न गाव’ ही संकल्पना राबविताना जिल्हा परिषदेतील अधिकारी-कर्मचाऱ्यांचे आरोग्यही तितकेच महत्त्वाचे आहे. स्वतःचे आरोग्य जपणारा कर्मचारीच अधिक सक्षमपणे समाजाची सेवा करू शकतो.”

श्री. राजूभैया भोसले,उपाध्यक्ष तथा सभापती, आरोग्य समिती, सातारा जिल्हा परिषद, सातारा



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
विविध ठिकाणी महिला-मुलींसमोर असभ्य वर्तन करणार्‍या विकृताला अटक; सातारा शहर डीबी पथकाची कामगिरी
पुढील बातमी
बँकेने सील केलेल्या मालमत्तेत परवानगीशिवाय पुन्हा प्रवेश केल्याप्रकरणी दाम्पत्यावर गुन्हा

संबंधित बातम्या