फलटणमध्ये गांजा विक्रीचा पर्दाफाश; आणखी दोघे जेरबंद, तीन आरोपींकडून ५ किलो ७३० ग्रॅम गांजा जप्त

by Team Satara Today | published on : 24 August 2026


सातारा : गांजा विक्रीप्रकरणी भुईंज पोलिसांनी स्थानिक गुन्हे शाखेच्या मदतीने फलटण शहरातील सोमवार पेठेत छापा टाकून आणखी दोघांना अटक केली. अमरदीप संजय गायकवाड (वय ३८) आणि संजय रायबा गायकवाड (वय ६०) अशी अटक केलेल्यांची नावे आहेत. त्यांच्याकडून ३ किलो ९३० ग्रॅम गांजा, किंमत ८२ हजार ५३० रुपये, जप्त करण्यात आला.

भुईंज पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या अमली पदार्थ अधिनियमातील गुन्ह्याच्या तपासादरम्यान ही कारवाई करण्यात आली. यापूर्वी याच प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात आली होती. त्यामुळे आतापर्यंत तीन आरोपींना अटक झाली असून, त्यांच्याकडून एकूण ५ किलो ७३० ग्रॅम गांजा, किंमत १ लाख २१ हजार ३३० रुपये, जप्त करण्यात आला आहे.

परिविक्षाधीन पोलीस उपअधीक्षक पूनम झगडे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्वजीत घोडके व भुईंज पोलिसांच्या पथकाने ही कारवाई केली. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक वैशाली कडुकर आणि वाई विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी सुनील साळुंखे यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई झाली.

गांजाचा पुरवठा व विक्रीच्या साखळीचा पुढील तपास पोलिसांकडून सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
कास तलाव परिसरातील हरित वैभवासाठी 10 हजार वृक्षांची मोहीम; 30 ऑगस्टला 500 रोपांनी प्रारंभ
पुढील बातमी
शिवथर, आरळे येथील डीपी फोडून अज्ञातांनी केली 36 हजारांच्या तांब्याच्या तारेची चोरी

संबंधित बातम्या