सातारा : श्री गुरु फाऊंडेशनचे अध्यक्ष शार्दूल जाधव यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधत, जकातवाडी येथील शारदाबाई पवार आश्रमशाळेतील १०० गरजू विद्यार्थ्यांना ऊबदार ब्लँकेट आणि रंग साहित्याची भेट देऊन सामाजिक बांधिलकीचा नवा आदर्श निर्माण करण्यात आला.
प्रजव फाऊंडेशन आणि श्री गुरु फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने ‘मायेची ऊब... रंगाची दुनिया’ या संकल्पनेतून शारदाबाई पवार प्राथमिक व माध्यमिक आश्रमशाळेत ‘वाढदिवस माझा-आनंद त्यांचा’ हा उपक्रम उत्साहात पार पडला. वाढदिवसाचा खर्च टाळून समाजातील वंचित घटकांच्या चेहऱ्यावर हास्य फुलवण्याच्या उद्देशाने प्राथमिक विभागातील १०० विद्यार्थ्यांना थंडीपासून संरक्षणासाठी दर्जेदार ब्लँकेट, तसेच त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी चित्रकला वही आणि रंगांची पेटी असलेले संच वाटप करण्यात आले.
या सामाजिक उपक्रमावेळी संस्थेचे कार्याध्यक्ष भाई शैलेन्द्र माने, माध्यमिक विभागाचे मुख्याध्यापक लक्ष्मण ढाणे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक दिलीप सुतार, प्रजव फाऊंडेशनचे अध्यक्ष अभिजीत भालेराव, संदीप रणदिवे, अमीर सय्यद, तसेच श्री गुरु फाऊंडेशनचे पदाधिकारी विशाल माने, सुरज बागल, उमेश भिलारे, आकीब सय्यद, अमोल बर्गे, गुरु जाधव आणि शार्दूल रणदिवे उपस्थित होते.
कार्यक्रमाचे नेटके सूत्रसंचालन समीर मुल्ला यांनी केले, तर मुख्याध्यापक दिलीप सुतार यांनी आभार मानले. हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी डॉ. वनिता कांबळे, सौ. रेणुका जाधव आणि श्रीमती सुजाता जाधव यांचे विशेष सहकार्य लाभले. वाढदिवसाच्या या अनोख्या उपक्रमाचे सर्वस्तरातून कौतुक होत आहे.