पिंपरी : अन्न आणि विचारांची भेसळ समाज आणि राष्ट्रासाठी घातक असते. नागरिकांनी अन्नाबाबत चौकस राहून आपल्या विचारांमध्येही डिजिटल युगात भेसळ होऊ नये, याची खबरदारी घेणे आवश्यक आहे, असे स्पष्ट मत अन्न व औषध प्रशासनाचे आयुक्त तुकाराम मुंढे यांनी मांडले.
दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने ‘भेसळमुक्त महाराष्ट्र, आरोग्यदायी महाराष्ट्र’ या उपक्रमांतर्गत प्रा. रामकृष्ण मोरे नाट्यगृह, चिंचवड येथे आयोजित ‘मनमोकळा संवाद’ कार्यक्रमात शनिवारी (दि. २२) सायंकाळी मुंढे यांनी हजेरी लावली. ज्येष्ठ पत्रकार मयूरेश कोण्णूर यांनी या मुलाखतीचे सूत्रसंचालन केले. मुंढे यांच्या आगमनावेळी उपस्थितांनी उभे राहून टाळ्यांचा गजर करीत त्यांचे स्वागत केले.
मुंढे म्हणाले की, केवळ झोपलेल्या व्यक्तीला जागे करता येते, झोपेचे सोंग घेणाऱ्याला नव्हे. जंक फूड आणि भेसळयुक्त पदार्थ आरोग्यासाठी हानिकारक ठरतात, म्हणून नागरिकांनी चौकस राहिले पाहिजे. विभागाच्या कारवाया ‘मुंढे पॅटर्न’ नसून ते त्यांच्या नियमित कर्तव्याचा एक भाग आहेत. ‘प्रामाणिकपणा आणि नैतिकता नसताना यश तात्पुरतेच राहते,’ असे ते म्हणाले. मुंढे यांच्या २१ वर्षांच्या सेवेत २५ बदल्या झाल्या असून, त्यांच्या कामाच्या गतीत त्यानंतर वाढ झाल्याचे त्यांनी सांगितले.
सोशल मीडियावरील वाढत्या लाइक्स आणि फॉलोअर्सवर सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देताना त्यांनी समाजात योग्य काय, हे नागरिकांनी ठरवावे, अशी अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलनाने झाली.
दिशा सोशल फाउंडेशनच्या वतीने तुकाराम मुंढे यांचा सत्कार करण्यात आला. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांचा व खेळाडूंचा त्यांनी सत्कार केला. मुंढे यांच्या जीवनावर आधारित पुस्तकातील काही अंशांचे वाचनही करण्यात आले. या प्रसंगी महापौर रवी लांगडे, दिशा फाउंडेशनचे सचिन साठे, रवी करपे, आजी-माजी पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.