कराडमधील एस.एस. मोबाईल शॉपीवर दरोडा; शॉपी फोडून सुमारे ३० लाख रुपयांच्या मोबाईलची चोरी

by Team Satara Today | published on : 23 August 2026


कराड : मोबाईल शॉपीवर दरोडा टाकून चोरट्यांनी दुकानातील सुमारे ११५ मोबाईल संच चोरून नेले. कारमधून आलेल्या चौघांनी शनिवारी मध्यरात्री कराड मधील मोहिते हॉस्पिटलजवळ असलेली मोबाईल शॉपी फोडून सुमारे ३० लाख रुपयांच्या मोबाईलची चोरी केली. या घटनेमुळे कराड शहरात खळबळ उडाली आहे. याबाबतची फिर्याद मोबाईल शॉपीचे मालक सचिन रामचंद्र पाटील यांनी शहर पोलिसांत दिली आहे.

फिर्यादी सचिन पाटील हे शुक्रवारी रात्री शॉपी बंद करून घरी गेले. त्यानंतर रात्री दोनच्या सुमारास चौघेजण कारमधून एस.एस. मोबाईल शॉपी येथे आले. त्यांनी प्रथम बाहेरील सीसीटीव्ही कॅमेरा तोडला. त्यानंतर शॉपीच्या दुकानाचे सेंटर लॉक व शटर तोडून दुकानात प्रवेश केला. दुकानातील कांऊटर डिस्प्लेमधील विविध कंपन्यांचे सुमारे ३० लाखांचे मोबाईल चोरून चोरट्यांनी तेथून पोबारा केला.

त्यानंतर दुकानशेजारी राहणाऱ्या एकाने या घटनेची माहिती सचिन पाटील यांना दिली. त्यांनी शॉपीमध्ये येऊन पाहिले असता चोरी झाल्याचे त्यांना दिसले. घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलिस अधिकारी राजश्री पाटील, वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय दराडे यांच्यासह डीबी पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. दुकानातील सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेऊन त्याची बारकाईने पाहणी सुरू केली आहे. 

चोरट्यांनी वापरलेली कार, त्यांच्या हालचाली तसेच सीसीटीव्हीमध्ये कैद झालेल्या दृश्यांच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू आहे. सीसीटीव्ही फुटेज आणि तांत्रिक तपासाच्या आधारे पोलिसांकडून शोध घेण्यात येत आहे. अधिक तपास गुन्हे प्रमुखचे सहायक पोलिस निरीक्षक विजय गोडसे करीत आहेत. दरोड्याची माहिती मिळताच घटनास्थळी फॉरेन्सिक टीम दाखल झाली. पथकाने दुकानाची पाहणी करून घटनास्थळावरून आवश्यक नमुने व पुरावे संकलित केले. या पुराव्यांच्या आधारे तपासाला दिशा देण्याचे काम सुरू आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
साताऱ्यातील बेपत्ता तरुणाचा मृतदेह रायगड जिल्ह्यातील रोहा तालुक्यातील नागोठणेत आढळला; मृत्यूचे नेमके कारण तपासाअंती स्पष्ट होणार
पुढील बातमी
बेशिस्त वाहनचालकांना पुसेगाव पोलिसांचा दणका; ६७ वाहनचालकांवर कारवाई, ५४ हजार रुपये दंड वसूल

संबंधित बातम्या