मेढा : गत निवडणुकीत मंत्री शिवेंद्रसिंहराजे गटाकडे पुरेसे ठरावधारक असतानाही राष्ट्रवादीचे शशिकांत शिंदे यांचा अवघ्या एका मताने निसटता पराभव झाला होता. त्यामुळे पुन्हा दगाफटका होऊ नये, यासाठी राजे गटाने खबरदारी घेऊन ठरावधारकांना भारतदर्शन सहलीवर पाठवल्याची चर्चा आहे. दरम्यान, पराभवाची परतफेड करण्यासाठी शिंदे गटानेही कंबर कसल्यामुळे जावळीचे राजकारण तापले आहे. यातून आरोप-प्रत्यारोप आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू आहे.
जावलीतून यापूर्वी बाबूराव वारागडे, भिकू बापू धनावडे, लालसिंगराव शिंदे, राजेंद्र शिंदे, सुनेत्रा शिंदे, शशिकांत शिंदे आदींनी जिल्हा मध्यवर्ती बँकेत तालुक्याचे नेतृत्व केले. कधी-कधी सामंजस्याने निवडणुका बिनविरोध झाल्या. पण, गतनिवडणुकीपासून राजे आणि शिंदे गटातील संघर्ष टोकाला पोहोचला आहे. याची झलक वरोशी, इंदवली, आखाडे, आलेवाडी आणि हातगेघर गावांतील ठरावांवेळी पाहायला मिळाली. बाचाबाचीतून सुरू झालेला संघर्ष विरोधकांना वाटेत अडवून मारहाण करण्यापर्यंत गेला आहे. यातून परस्परविरोधी गुन्हे दाखल करण्याचे प्रकार सुरू आहेत. यामुळे जिल्हा बँकेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होण्यापूर्वीच जावळीचे खोरे तापले आहे.
मेढा भागात आंबेघर गणात ज्ञानदेव रांजणे विरुद्ध आशिष कदम यांच्यातले आरोप-प्रत्यारोपांचे वादंग आता कार्यकर्त्यांमध्ये पोहोचले आहे. ऐकेरी भाषा, हामरीतुमरी, जशास तसे प्रत्युत्तर देण्याची भाषा सुरू आहे. यामुळे दोन्ही गटांकडून आपले ठरावधारक सुरक्षित ठिकाणी ठेवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. मेढा परिसरातील सुमारे १५ सोसायट्यांचे ठराव आहेत. उर्वरित ३४ ठराव कुडाळ परिसरातील आहेत. यावर शशिकांत शिंदे, वसंतराव मानकुमरे, मोहनराव शिंदे, रामदास पार्टे, सचिन गोगावले, सौरभ शिंदे, गोरख महाडिक, जयदीप शिंदे, सुहास गिरीगोसावी यांचा वरचष्मा आहे. दोन्ही गटांकडून अद्याप कोणत्याही उमेदवारांची घोषणा झालेली नाही.
ठरावधारक सहलीवर
बहुतांश ठराव आपल्या बाजूने करून घेण्यासाठी राजे गटाकडून सातत्याने प्रयत्न सुरू होते. ठराव होताच पाच ऑगस्टपासून त्यांनी ठरावधारकांना भारतदर्शन सहलीवर पाठवल्याची चर्चा आहे. गेल्यावेळी गोव्यातून रात्रीत काही ठरावधारक गायब झाले होते. त्यानंतर अवघ्या एका मताधिक्याने विजय मिळविण्यात राजे गटाला यश आले होते.
परतफेडीसाठी शिंदे गट सज्ज
मागील निवडणुकीत शशिकांत शिंदे यांच्या विरोधात ज्ञानदेव रांजणे हे उमेदवार होते. त्यावेळी रांजणे यांना २५ मते मिळाली, तर शिंदे यांचा एका मताने पराभव झाला होता. त्या पराभवाची परतफेड करण्यासाठी शिंदे गटाकडून ठरावधारकांची जुळवाजुळव सुरू आहे. यासाठी गनिमी कावा होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.