सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक भाजप म्हणून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालीच लढणार - मंत्री जयकुमार गोरे

by Team Satara Today | published on : 22 August 2026


सातारा : सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेची निवडणूक भाजप म्हणून लढणार आहे. सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या नेतृत्वाखालीच निवडणूक लढली जाईल, अशी गुगली ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना टाकली. 

सातारा जिल्हा परिषदेतील एका बैठकीसाठी शनिवारी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे आले होते. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष राजू भोसले, समाजकल्याण समिती सभापती ऋषिकेश धायगुडे-पाटील यांच्यासह भाजपचे पदाधिकारी उपस्थित होते.

सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची निवडणूक पुढील काही महिन्यांत होत आहे. या निवडणुकीसाठी संस्थांच्या ठरावांची प्रक्रिया पार पडली आहे. पण, अनेक तालुक्यांत त्यावरुन वाद, राडा आणि मारामारीही झाल्याचे दिसून आले. तसेच आजही नेत्या-नेत्यांत इशारा-प्रति इशारा देण्याचे काम सुरू झाले आहे. त्यामुळे सहकारात राजकारण पुरते घुसले आहे.

त्यातच ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी सातारा जिल्हा बँकेवर भाजपचा झेंडा फडकविण्याचा पूर्ण निर्धार केला आहे. यासाठी महायुतीतील घटक पक्षांनाही ते बाजूला ठेवू शकतात अशी चर्चा आहे. अशातच त्यांनी शनिवारी साताऱ्यात जिल्हा बँकेबाबत एक वक्तव्य करून चर्चेला पुन्हा राजकीय फोडणी दिली आहे.

सहकारी बरोबर आलेतर विचार करु...

साताऱ्यात पत्रकारांशी बोलताना मंत्री गोरे यांनी जिल्हा बँकेची निवडणूक लागत आहे. जिल्हा बॅंक ही जिल्ह्यातील महत्त्वाची संस्था आहे. या निवडणुकीमध्ये सर्वांनी बसून विचार करण्याची आवश्यकता आहे. भाजप म्हणून ही निवडणूक आम्ही लढू. सहकारी सोबत आले तरी त्याचाही विचार करू. पण, ही बँकेची निवडणूक भाजप म्हणून मंत्री शिवेंद्रसिंहराजेंच्या नेतृत्वाखाली लढणार आहोत, असे स्पष्ट केले. त्यामुळे मंत्री गोरे यांच्या या राजकीय वक्तव्यामागे बरेच अर्थ दडल्याची चर्चा सुरू झाली आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
महिला देशाची सर्वात मोठी ताकद..! पुण्यात राहुल गांधींचा मनुस्मृतीवर निशाणा, सामाजिक व्यवस्थेवरही केले भाष्य
पुढील बातमी
जावलीचे ठरावधारक सहलीवर; तरीही फुटीची धास्ती, आरोप-प्रत्यारोप आणि परस्पर विरोधी गुन्हे दाखल करण्याचे सत्र सुरू

संबंधित बातम्या