पुणे :काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुण्यातील ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमात विद्यार्थ्यांशी संवाद साधत तरुणाई, महिला स्वातंत्र्य आणि देशाच्या भविष्यासंदर्भात आपली भूमिका मांडली. या संवादादरम्यान त्यांनी आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचीही दखल घेतल्याचे समोर आले आहे. कार्यक्रमात एका तरुणीने पुण्यात सुरू असलेल्या आदिवासी विद्यार्थ्यांच्या उपोषणाचा मुद्दा राहुल गांधी यांच्या निदर्शनास आणून दिला. आदिवासी विद्यार्थ्यांकडून वसतिगृहासंदर्भातील राज्य सरकारच्या एका शासन निर्णयाला विरोध केला जात असून, त्यासाठी मांजरी परिसरात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाची माहिती मिळाल्यानंतर राहुल गांधी यांनी, “मला उपोषणस्थळी बोलवा,” असे सांगितल्याचे समोर आले. त्यामुळे राहुल गांधी प्रत्यक्ष आंदोलनस्थळी भेट देणार का, याबाबत आता चर्चा सुरू झाली आहे.
पुण्यातील मांजरी परिसरात आदिवासी विद्यार्थी विविध मागण्यांसाठी उपोषण करत आहेत. राहुल गांधी पुण्यात असतानाच या विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा कार्यक्रमात उपस्थित झाल्याने राजकीय आणि विद्यार्थी वर्तुळाचे लक्ष या घडामोडीकडे लागले आहे. मात्र, राहुल गांधी उपोषणस्थळी प्रत्यक्ष जाणार असल्याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. त्यामुळे ‘छात्रों की गूंज’ कार्यक्रमानंतर राहुल गांधी या आंदोलनाची पुढील दखल घेतात का ? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
महिलांबाबत राहुल गांधींची भूमिका
दरम्यान, विद्यार्थ्यांशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी महिलांना देशाची मोठी ताकद असल्याचे सांगितले. महिला स्वातंत्र्य आणि समान संधींच्या मुद्द्यावर बोलताना त्यांनी सामाजिक व्यवस्थेवरही भाष्य केले. मनुस्मृतीचा संदर्भ देत त्यांनी महिलांच्या स्वातंत्र्याच्या मुद्द्यावर आपली भूमिका मांडली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच आज राजकारणावर चर्चा करणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यामुळे विद्यार्थ्यांशी झालेला संवाद हा प्रामुख्याने तरुणाई, महिला आणि भारताच्या भविष्यासारख्या विषयांभोवती केंद्रित राहिला. राहुल गांधी यांच्या या संवादात उपस्थित झालेला आदिवासी विद्यार्थ्यांच्या आंदोलनाचा मुद्दा मात्र कार्यक्रमानंतर चर्चेचा केंद्रबिंदू ठरला आहे.