सातारा : मराठा पॅलेस परिसरात तरुणाला अडवून शिवीगाळ करत लाथाबुक्क्यांनी आणि दगडाने मारहाण केल्याची घटना घडली. या प्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात सहा जणांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. द्वारकेश बाळासाहेब वायदंडे (वय ३०, रा. करंजकरनगर, विलासपूर) यांनी याबाबत फिर्याद दिली आहे.
पोलिसांच्या माहितीनुसार, २० मे रोजी सकाळी साडेसात ते पावणेआठच्या दरम्यान हा प्रकार घडला. सुजीत नलवडे, ऋषी सावंत, अजय नलावडे, सखी गोटेकर, चरण पवार आणि अमृत (पूर्ण नाव समजू शकले नाही), सर्व रा. इंदिरानगर, विलासपूर, यांनी संगनमत करून वायदंडे यांना शिवीगाळ केली.
त्यानंतर संशयितांनी हाताने व लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. तसेच दगडानेही मारहाण करून त्यांना जखमी केले. या वेळी जीवे मारण्याची धमकी दिल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.
या घटनेप्रकरणी २१ ऑगस्ट रोजी सातारा शहर पोलिस ठाण्यात गुन्हा क्रमांक ८५४/२०२६ दाखल झाला. मारहाण, दुखापत, शिवीगाळ, धमकी तसेच बेकायदेशीर जमावासंदर्भातील कलमांनुसार पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. मपोहवा सूर्यवंशी तपास करीत आहेत.