शिष्यवृत्ती पोर्टलवर ३६ बोगस विद्यार्थ्यांची नोंद केल्याचा प्रकार उघडकीस; ४.८७ लाखांचा घोटाळा, अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल

by Team Satara Today | published on : 22 August 2026


फलटण :  खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या नावाचा आणि यूजर आयडी-पासवर्डचा गैरवापर करून शिष्यवृत्ती पोर्टलवर ३६ बोगस विद्यार्थ्यांची नोंद केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या बनावट अर्जांच्या आधारे शासनाची ४ लाख ८७ हजार ८०० रुपयांची शिष्यवृत्तीची रक्कम हडप केल्याचा आरोप आहे.

फलटण तालुक्यातील तांबमाळ येथील विद्या प्रसारक संस्था संचलित खासगी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेशी संबंधित हा प्रकार आहे. विभागीय सहसंचालक कार्यालयातील प्रशासनाधिकारी विलास धोंडू कदम (वय ५५) यांनी फलटण शहर पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यावरून अज्ञात व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिस तपासानुसार, १ ऑगस्ट २०२१ ते ३१ जुलै २०२३ या कालावधीत संस्थेच्या नावाचा गैरवापर करण्यात आला. केंद्र शासनाच्या मार्गदर्शक सूचना आणि शिक्षण संचालनालयाच्या आदेशांचे उल्लंघन करून संस्थेचा यूजर आयडी व पासवर्ड वापरत ३६ बनावट विद्यार्थ्यांची माहिती शिष्यवृत्ती पोर्टलवर भरली गेली.

या अर्जांच्या आधारे शासनाकडून ४ लाख ८७ हजार ८०० रुपयांची शिष्यवृत्ती मिळवण्यात आली. ही रक्कम कोणत्या बँक खात्यांमध्ये जमा झाली, संबंधित खातेदार कोण आहेत आणि संस्थेचा लॉगिन तपशील नेमका कोणी वापरला, याचा शोध पोलिस घेत आहेत. चौकशी समितीचा अहवाल तसेच संबंधित कागदपत्रे पोलिसांकडे सादर करण्यात आली असून, या प्रकरणाची व्याप्ती वाढण्याची शक्यता आहे.



लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
फलटणमध्ये पितळी ताशांवर डल्ला; ९६ हजारांचा ऐवज चोरणारा ताब्यात
पुढील बातमी
साताऱ्यात मराठा पॅलेस परिसरात तरुणाला मारहाण केल्याप्रकरणी सहा जणांवर गुन्हा

संबंधित बातम्या