मायणी येथील मालमत्ता व्यवहारात बनावट कागदपत्रांचा वापर; देशमुख, शिंदे यांना पोलिस कोठडी

by Team Satara Today | published on : 22 August 2026


वडूज : मायणी (ता. खटाव) येथील मालमत्तेशी संबंधित व्यवहारात बनावट कागदपत्रे व बक्षीसपत्र तयार केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात संशयित दीपक आप्पासाहेब देशमुख आणि रोहित प्रताप शिंदे यांना वडूज न्यायालयाने सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली. याबाबत वडूज पोलिस ठाण्यात ३० मार्च २०२३ रोजी गुन्हा दाखल झाला होता. देशमुख आणि शिंदे शुक्रवारी (दि. २१) न्यायालयात शरण आले.

१३ कोटी २० लाख रुपये किमतीच्या मालमत्तेबद्दल बनावट कागदपत्र आणि बक्षीसपत्र तयार केल्याप्रकरणी १५ संशयितांवर वडूज पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. यातील दीपक देशमुख आणि रोहित शिंदे यांचा पोलिसांकडून शोध सुरू होता. शुक्रवारी ते दोघे स्वत:हून वडूज न्यायालयात हजर झाले. पोलिसांनी तपास अहवाल सादर करून पुढील तपासासाठी आरोपींच्या पोलिस कोठडीची मागणी केली. त्यानुसार न्यायालयाने दोन्ही संशयितांना सहा दिवसांची पोलिस कोठडी सुनावली.

असे होते प्रकरण

नोव्हेंबर २०२२ मध्ये दुय्यम निबंधक श्रेणी-१, खटाव-वडूज यांच्या कार्यालयात एका बक्षीसपत्राची नोंद करण्यात आली. त्या व्यवहाराचा संबंध मायणी येथील जमिनीशी होता. संबंधित कागदपत्रे व ठरावांची चौकशी करण्यात आली. त्यात ठराव, बक्षीसपत्र आणि कागदपत्रांवरील सह्या व अंगठ्यांच्या निशाणींमध्ये विसंगती आढळली. पोलिसांच्या तपास अहवालानुसार, काही कागदपत्रे अद्याप मिळालेली नसून ती मिळविण्यासाठी विविध शासकीय कार्यालयांशी पत्रव्यवहार करण्यात आला आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नियमित प्रवास करणाऱ्या नागरिकांसाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचा मोठा दिलासा; ३५० रुपयांत एका महिन्याचा अमर्याद लोकल पास
पुढील बातमी
कुंभमेळ्याच्या कामात ४५ ते ५० टक्के कमिशन लाटले जात असल्याचा काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पृथ्वीराज चव्हाण यांचा आरोप

संबंधित बातम्या