दादागिरी करणार नाही, पण चुकीला ठामपणे विरोध करणार : शशिकांत शिंदे

by Team Satara Today | published on : 22 August 2026


मेढा : गावांमध्ये दादागिरी करण्याचा किंवा संघर्षाला खतपाणी घालण्याचा आपला कोणताही हेतू नसून, चुकीच्या प्रवृत्तींना ठाम विरोध करत राहणार असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते व माजी आमदार शशिकांत शिंदे यांनी स्पष्ट केले.

​हुमगाव-आखाडे आणि इंदवली परिसरातील घडामोडी तसेच हाणामारीच्या घटनेनंतर दोन्ही बाजूंकडून आरोप-प्रत्यारोप सुरू असल्याच्या पार्श्वभूमीवर ते बोलत होते. या प्रकरणात पोलिसांना सर्व आवश्यक पुरावे सादर करण्यात आले आहेत; मात्र पोलिसांनी एकांगी कारवाई करत एकाच बाजूने गुन्हा दाखल केल्याचा आरोप त्यांनी केला. दुसऱ्या घटनेत सोन्याची साखळी हिसकावणे व दरोड्यासारखी गंभीर कलमे लावण्याचा प्रयत्न झाला असून, या संपूर्ण कारवाईला न्यायालयात आव्हान देणार असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच या प्रकरणी संबंधित व्यक्तींवरही गुन्हा दाखल व्हावा, अशी मागणी न्यायालयाकडे केली जाईल असे त्यांनी स्पष्ट केले.

​राजकीय मतभेद असू शकतात, मात्र त्याचे रूपांतर वैयक्तिक संघर्षात होऊ नये, असे सांगत कोणाच्याही घरात जाऊन विनाकारण त्रास देणे अथवा वाद निर्माण करणे अयोग्य असल्याचे त्यांनी नमूद केले. १९९९ पासून राजकीय प्रवासात आपल्यावर होणाऱ्या आरोपांचा संदर्भ देत, चुकीचे वर्तन करणाऱ्यांना योग्य मार्गावर आणणे गरजेचे असले तरी त्यासाठी दहशत किंवा दादागिरीचा मार्ग आपण कधीही स्वीकारणार नसल्याची भूमिका त्यांनी मांडली.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
नायगाव येथे कंपनीत कॉन्ट्रॅक्ट आणि ५ लाखांच्या खंडणीसाठी दमदाटी; शिरवळ पोलिसांकडून पाच जणांना अटक
पुढील बातमी
लोणंद ग्रामपंचायतीच्या माजी सरपंचावर वाढदिनीच काळाचा घाला; दुचाकीने दुचाकीला धडक दिल्याने अपघातात मृत्‍यू

संबंधित बातम्या