सातारा : राजमाता नर्सिंग स्कूल अँड कॉलेज, सातारा येथे विद्यार्थ्यांसाठी ‘ग्रंथालय परिचय कार्यक्रम’ उत्साहपूर्ण वातावरणात आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमासाठी साहित्यवेल वाचन प्रसार चळवळीचे संचालक प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती लाभली.
‘बदलते संस्कार, नीतीमूल्यांचे संवर्धन आणि जीवनातील ग्रंथांचे महत्त्व’ या विषयावर मार्गदर्शन करताना प्रा. डॉ. वाघमारे म्हणाले की, व्यक्तीच्या विचारांना, आचारांना आणि भावनांना आकार देण्याची प्रक्रिया म्हणजे संस्कार होय. घर, शाळा आणि समाज या तिन्ही स्तरांवर मुलांवर संस्कार होत असतात. सामाजिक पर्यावरणाचाही व्यक्तीच्या जीवनावर मोठा प्रभाव पडतो. व्यक्ती कोणता मार्ग निवडते, कोणत्या हेतूने जीवन जगते आणि कोणती जीवनशैली स्वीकारते, यावरून तिच्या संस्कारांचे दर्शन घडते.
सुसंस्कारित जीवनाचा आदर्श प्रत्येकाने समोर ठेवला पाहिजे. ‘मनाला जसे घडविले जाते, तसा माणूस घडत जातो,’ असे सांगून त्यांनी प्रत्येक घरात चांगला आणि सद्गुणी माणूस घडविण्याची गरज व्यक्त केली. सत्यनिष्ठा, प्रामाणिकपणा, करुणा, समता, बंधुता, संयम, सहिष्णुता, कर्तव्यनिष्ठा, नम्रता, स्वावलंबन, परिश्रम, वक्तशीरपणा, धैर्य आणि सद्चारित्र्य ही मूल्ये जीवनात अंगीकारली पाहिजेत. तसेच प्रत्येक भारतीय नागरिकाने आपली घटनात्मक कर्तव्ये समजून घेऊन ती जबाबदारीने पार पाडली पाहिजेत, असे त्यांनी सांगितले.
आपले जीवन अधिकाधिक उदात्त, उन्नत आणि महान बनविणे आपल्या हातात आहे. मात्र, दाखवायचे एक आणि वागायचे दुसरे, या दांभिक प्रवृत्तीमुळे सामाजिक जीवनात भ्रष्टता निर्माण होते. त्यामुळे दांभिकता सोडून प्रामाणिकपणे सद्गुणी व चारित्र्यसंपन्न माणूस बनण्याचा प्रयत्न प्रत्येकाने केला पाहिजे, असेही प्रा. डॉ. वाघमारे यांनी स्पष्ट केले.
ग्रंथांच्या वाचनामुळे माणसाचे मन प्रगल्भ व उन्नत होते. वाचनातून विचारांची समृद्धी, संवेदनशीलता आणि विवेक विकसित होतो. त्यामुळे विद्यार्थ्यांनी दररोज किमान अर्धा तास ललित व वैचारिक साहित्याचे नियमित वाचन करावे, असा संदेश त्यांनी दिला.
कार्यक्रमास महाविद्यालयाच्या प्राचार्या स्मिता जाधव, उपप्राचार्या मधुरा काकडे तसेच ग्रंथपाल तेजश्री यादव यांची उपस्थिती होती. यावेळी गौरी वाळवेकर, शिवानी डोईफोडे, वैभवी मल्लकमीर, प्रियांका गुरव, सौरभ धेसले, हर्षदा शिंदे, ऋतुजा जगताप आणि रुक्सार काझी या शिक्षकांचीही उपस्थिती लाभली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक ग्रंथपाल तेजश्री यादव यांनी केले. त्यानंतर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन GNM तृतीय वर्षाच्या विद्यार्थिनी वैष्णवी उबाळे आणि प्रांजली बनसोडे यांनी उत्स्फूर्तपणे केले. विद्यार्थ्यांनी कार्यक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. वाचनाची आवड, ज्ञानवृद्धी, सकारात्मक विचारसरणी आणि व्यक्तिमत्त्व विकास याबाबत विद्यार्थ्यांमध्ये जागरूकता निर्माण करण्याच्या दृष्टीने हा कार्यक्रम उपयुक्त ठरला.
कार्यक्रमाच्या प्रारंभी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आला. तसेच फ्लॉरेन्स नाइटिंगेल यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून दीपप्रज्वलन करण्यात आले. कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी प्राचार्या, उपप्राचार्या, ग्रंथपाल, शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.