म्युल अकाऊंट चालवून फसवणूक करणारी टोळी जेरबंद; 2 लाख 34 हजारांचा मुद्देमाल जप्त; सायबर गुन्हे शाखेची कामगिरी

by Team Satara Today | published on : 21 August 2026


सातारा : पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी नॅशनल सायबर क्राईम रिपोर्टींग पोर्टलवर सायबर फसवणूक करणारे संघटीत पद्धतीने गुन्हे करत असून निरपराध नागरीकांना ऑनलाईन माध्यमातून फसवणूक इन्व्हेस्टमेंट स्कीम, पार्ट टाईम जॉब ऑफर, डिजीटल रेस्ट, तसेच विविध प्रकारच्या अमिषाद्वारे पैसे हस्तांतरीत करणारी टोळी कार्यरत असून त्यांची माहिती प्राप्त करुन कारवाई करण्याच्या सूचना सायबर पोलीस ठाण्यास दिल्या आहेत.

याबाबत माहिती देताना अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी सांगितले, राष्ट्रीय सायबर क्राईम रिपोर्टिंग पोर्टलवर मिळणार्‍या माहितीच्या आधारे सायबर गुन्ह्यात वापरल्या जाणार्‍या बनावट खात्यांचा मागोवा घेतला जात होता. दि. 20 रोजी सायबर ठाण्याचे पो. कॉ. ओंकार डुबल यांना गोपनीय माहिती मिळाली की, कोरेगाव येथील काही तरुण सर्वसामान्य नागरिकांना 1.5 ते 3 टक्के कमिशनचे आमिष दाखवून त्यांची बँक खाती, एटीएम/डेबिट कार्ड्स व सिम कार्डस् गोळा करत आहेत. ही खाती पुढे सायबर गुन्हेगारांना फसवणुकीची रक्कम प्राप्त करण्यासाठी व हस्तांतरित करण्यासाठी दिली जात आहेत, अशी माहिती प्राप्त झाल्यानंतर माहितीची खातरजमा करून सायबर गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळी, महिला हेड कॉन्स्टेबल सुप्रिया रोमन, संदीप पाटील, ओंकार डुबल, रणजीत कुंभार, प्रशांत मोरे, जुनघरे व पवार या पथकाने पंचांच्या उपस्थितीत कोरेगाव येथील तीळगंगा नदी पुलाजवळ सापळा रचला. एक डमी खातेदार तयार करून एटीएम कार्ड स्वीकारण्यासाठी आलेल्या इसमास रंगेहात ताब्यात घेतले. त्याच्याकडे सखोल विचारपूस करुन त्याचे आणखी 3 साथीदार यांना सायबर पोलिसांनी ताब्यात घेवून त्यांच्याकडे तपास केला असता संबंधितांच्या ताब्यातील व त्यांनी पुरवलेल्या बँक खात्यांवर आंध्र प्रदेश, कर्नाटक, तमिळनाडू, तेलंगणा, गुजरात, महाराष्ट्र, उत्तर प्रदेश यांसारख्या विविध राज्यांमधून 35 पेक्षा जास्त सायबर फसवणुकीच्या तक्रारी नोंद असल्याचे निष्पन्न झाले आहे. आरोपी हे टेलिग्राम व इन्स्टाग्रामद्वारे मुख्य सायबर सूत्रधारांच्या संपर्कात होते.

संबंधित चौघांकडून 5 मोबाईल हँडसेट्स, विविध बँकांचे 8 क्रेडिट-एटीएम कार्ड्स, 4 जादा सिम कार्ड आणि आधार, पॅन कार्ड्स Aव इतर कागदपत्रे तसेच 1 रॉयल इनफिल्ड बुलेट गाडी (एमएच 11 डीपी 4336) आणि 33 हजार 650 रोख रक्कम असा एकूण 2 लाख 34 हजार 750 रुपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आहे. संबंधितांविरुध्द कोरेगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा तपास स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विश्‍वजीत घोडके करीत आहेत.

सातारा जिल्ह्यातील नागरीकांनी कोणीही पैशांच्या वा कमिशनच्या आमिषाला बळी पडून स्वतःचे किंवा नातेवाईकांचे बँक खाते, एटीएम कार्ड, पासबुक किंवा सिमकार्ड अनोळखी अथवा इतर व्यक्तींना वापरण्यासाठी देऊ नये. असे केल्यास तुम्ही नकळत आंतरराज्यीय सायबर गुन्हेगारीचे भागीदार बनू शकता व तुमच्यावर कठोर कायदेशीर कारवाई होऊ शकते. असा प्रकार आढळल्यास तात्काळ जवळच्या पोलीस ठाण्याशी किंवा 1930 या सायबर हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधावा. असे आवाहन पोलीस अधीक्षक निखील पिंगळे यांनी केले आहे.

पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांच्या मार्गदर्शनाखाली सायबर गुन्हे शाखेचे सहा. पोलीस निरीक्षक राजेश माळी, महिला हेड कॉन्स्टेबल सुप्रिया रोमन, संदीप पाटील, ओंकार डुबल, रणजीत कुंभार, प्रशांत मोरे, जुनघरे व पवार यांनी ही कारवाई केली असून कारवाई मधील सर्व पोलीस अधिकारी व अंमलदार यांचे पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, अपर पोलीस अधीक्षक डॉ. वैशाली कडूकर यांनी अभिनंदन केले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
सोळशी प्रकल्पाबाबतच्या शंका व अडचणी दूर करण्यासाठी लोकप्रतिनिधी व ग्रामस्थांची संयुक्त बैठक घ्या - पालकमंत्री शंभूराज देसाई
पुढील बातमी
अरविंद गवळी कॉलेज ऑफ फार्मसीच्या फार्माकोग्नोसीच्या विभागप्रमुख पौर्णिमा शेलार-गाढवे यांना पीएचडी पदवी प्रदान

संबंधित बातम्या