कराड : मास्क व ग्लोव्हज घातलेल्या चोरट्यांनी अपार्टमेंटमधील पाच ते सहा फ्लॅट फोडून किमती ऐवज लंपास केला. मुंढे येथील साई विश्व आणि साईराम गॅलेक्सी अपार्टमेंटमध्ये ही खळबळजनक घटना घडली. तोंडाला मास्क व हातात ग्लोव्हज घातलेले तीन ते चार संशयित चोरटे सीसीटीव्हीत कैद झाले आहेत. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेज सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाले आहे. चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केल्याने भीतीचे वातावरण पसरले आहे.
मुंढे येथील साई विश्व आणि साईराम गॅलेक्सी अपार्टमेंटमधील बंद आठ फ्लॅटची कुलपे कटावणीने तोडत चोरी केली. चोरीचा हा सर्व घटनाक्रम अपार्टमेंटमधील सीसीटीव्हीमध्ये कैद झाला आहे. या सीसीटीव्ही फुटेजमध्ये हे चोरटे अतिशय सावधपणे वावरताना दिसत आहेत. घरफोडी करण्यापूर्वी त्यांनी परिसराची पाहणी केल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
समोर आलेले सीसीटीव्ही फुटेज हा सध्या या घटनेतील सर्वात महत्त्वाचा धागा आहे. मास्क आणि ग्लोव्हजमुळे चोरट्यांची ओळख पटवणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे. मुंढे गावातील या घरफोडीच्या घटनेने नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे.