सातारा जिल्हा बँकेत वेदांतिकराजे भोसले यांची एन्ट्री; आष्टे विकास सोसायटीतून वेदांतिकराजे भोसले यांच्या नावाचा ठराव, उदयनराजे गटाच्या भूमिकेकडे लक्ष

by Team Satara Today | published on : 21 August 2026


सातारा : सातारा जिल्हा बँकेच्या सोसायटी मतदार संघात आतापर्यंत अजिंक्य राहिलेले मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले रिझर्व्ह बँकेच्या नियमामुळे या निवडणुकीच्या रिंगणाबाहेर राहणार आहेत. त्यामुळे हे अजिंक्यपद कोणाकडे राहणार याची उत्सुकता असतानाच आष्टे विकास सोसायटीतून वेदांतिकराजे भोसले यांच्या नावाचा ठराव झालेला असल्यामुळे त्यांची जिल्हा बँकेत एन्ट्री होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

सातारा जिल्हा बँकेच्या राजकारणात मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांचा दबदबा राहिला आहे. सातारा सोसायटी मतदार संघातून निवडून जाणारे शिवेंद्रसिंहराजे भोसले गेल्या निवडणुकीत बिनविरोध निवडून आले होते. मात्र, सलग दहा वर्षे संचालक राहिलेल्या व्यक्तींना आरबीआयच्या नियमांनुसार यावेळी निवडणूक लढविता येणार नसल्याने शिवेंद्रसिंहराजे यांच्या जागी कोणाला संधी मिळणार, याची उत्सुकता वाढली आहे. 

दरम्यान, सातारा विकास सोसायटी मतदार संघातून १४६ ठराव प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आष्टे विकास सोसायटीतून शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या पत्नी वेदांतिकराजे भोसले, रामकृष्णनगर सोसायटीतून शिवेंद्रसिंहराजे भोसले, लिंब सोसायटीतून त्यांचे विश्वासू कार्यकर्ते जितेंद्र सावंत यांच्या नावाचा ठरावा झाला आहे. मांडवे सोसायटीतून विक्रम लालासो पवार यांच्या नावाचा ठराव झाला आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या जागी त्यांचे विश्वासू सहकाऱ्यांना संधी मिळणार की जिल्हा बँकेचे राजकारण हाताळण्याच्या दृष्टीने वेदांतिकराजे भोसले यांना संधी मिळणार याची उत्सुकता लागली आहे.

भाजपने स्वतंत्र पॅनेल उभारल्यास वेगळे चित्र

जिल्हा बँकेच्या निवडणुकीत भाजपने स्वतंत्र पॅनेल उभे करण्याचा निर्णय घेतल्यास समीकरणे बदलू शकतात. अशा परिस्थितीत खंबीर संचालक जिल्हा बँकेत जाण्याच्या दृष्टीने भाजप तसेच शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या निर्णयाकडे सभासदांचे लक्ष लागले आहे.

उदयनराजे गटाची भूमिका काय राहणार ?


सातारा तालुक्यात खासदार उदयनराजे भोसले यांना मानणाराही मोठा गट आहे. खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्यात या मतदारसंघाबाबत एकमत होते की नाही, यावर मोठ्या प्रमाणात गणिते अवलंबून राहणार आहेत. दोन्ही नेत्यांची भूमिका काय राहणार यावरही उमेदवारीचे चित्र निश्चित होण्याची शक्यता आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
बांगला देशच्या नव्या राष्ट्रपतिपदी बीएनपीचे ज्येष्ठ नेते मिर्झा फखरुल इस्लाम आलमगीर
पुढील बातमी
मुंढे येथे मास्क गँगचा धुमाकूळ; चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य केल्याने भीतीचे वातावरण, चोरटे सीसीटीव्हीत कैद

संबंधित बातम्या