मृद व जलसंधारण विभागातर्फे भव्य वॉकथॉन आणि रील्स स्पर्धेचे साताऱ्यात आयोजन; नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन

by Team Satara Today | published on : 18 August 2026


सातारा : वाढत्या जलसंकटाच्या पार्श्वभूमीवर जलसाक्षरता आणि जलसंधारणाचा संदेश घरोघरी पोहोचवण्यासाठी मृद व जलसंधारण विभागाच्यावतीने चला पाण्यासाठी चालूया या विशेष घोषवाक्यासह भव्य पदयात्रेचे (वॉकथॉन) आयोजन करण्यात आले आहे.

'पाणी वाचवा भविष्य घडवा' आणि 'पाणी अडवा, पाणी जिरवा' या मोहिमेअंतर्गत आयोजित ही पदयात्रा शुक्रवार दि. २१ ऑगस्ट २०२६ रोजी सकाळी 7 वाजता सातारा येथील  छत्रपती शाहू क्रीडा संकून येथून सुरू होणार आहे. या ३ किलोमीटर अंतराच्या पदयात्रेत सहभागी होणाऱ्या नागरिकांना टी-शर्ट, कॅप, बॅच आणि ई-प्रमाणपत्र विनामूल्य दिले जाणार आहे.

पदयात्रेसोबतच नागरिकांमध्ये आणि विशेषतः तरुणाईमध्ये जलसंवर्धनाची जनजागृती करण्यासाठी एका राज्यस्तरीय रील्स (Reels) स्पर्धेचेही आयोजन करण्यात आले आहे. ही स्पर्धा १५ ते २० ऑगस्ट २०२६ दरम्यान पार पडणार असून यामध्ये सहभागी होणाऱ्यांना जलसंधारणाचे महत्त्व, पाण्याची बचत व संवर्धन, झाडे लावा-पर्यावरण वाचवा, तसेच आपल्या गावातील अथवा परिसरातील जलसंधारणाचे यशस्वी उपक्रम यांसारख्या विषयांवर रील्स शूट करून सादर करावयाच्या आहेत. या रील्स स्पर्धेतील विजेत्यांसाठी आकर्षक रोख पारितोषिके ठेवण्यात आली असून प्रथम विजेत्यास २५ हजार  रुपये, द्वितीय विजेत्यास १५ हजार  रुपये आणि तृतीय विजेत्यास १० हजार  रुपये देऊन सन्मानित करण्यात येईल.

या दोन्ही उपक्रमांमध्ये नोंदणी करण्यासाठी विभागाने क्यूआर कोड (QR Code) प्रसिद्ध केला आहे.   जिल्ह्यातील नागरिकांनी, युवक-युवतींनी आणि सामाजिक संस्थांनी या उपक्रमात उस्फूर्तपणे सहभागी व्हावे, असे आवाहन मृद व जलसंधारण विभागातर्फे करण्यात आले आहे.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
जयसिंगराव करपे हायस्कूलमध्ये स्वातंत्र्यदिनी प्रा. डॉ. सुभाष वाघमारे यांच्या प्रेरणेतून ‘साहित्यवेल वाचन प्रसार अभियानाचा’ प्रारंभ

संबंधित बातम्या