उज्ज्वला गॅस कनेक्शन वारसाच्या नावे हस्तांतरासाठी धोरणात्मक बदल करावा; भाजप जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत भोसले यांचे प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांना निवेदन

by Team Satara Today | published on : 18 August 2026


सातारा : प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत लाभार्थीचा मृत्यू झाल्यानंतर त्यांच्या नावावरील गॅस कनेक्शन पात्र कायदेशीर वारसाच्या नावे हस्तांतरित करण्यासाठी सुलभ व स्पष्ट प्रक्रिया निश्चित करावी, तसेच याबाबत योजनेच्या नियमांमध्ये आवश्यक तो धोरणात्मक बदल करावा, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे सातारा जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत भोसले यांनी केली आहे.

भारतीय जनता पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्या पुढाकाराने राज्यातील विविध जिल्ह्यांमध्ये नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी ‘सेवा अभियान’ जनता दरबाराचे आयोजन करण्यात येत आहे.

सातारा जिल्ह्यात आयोजित करण्यात आलेल्या जनता दरबारात नागरिकांची निवेदने स्वीकारण्यासाठी प्रदेशाध्यक्षांचे स्वीय सहाय्यक संतोष साखरे उपस्थित होते. यावेळी विक्रांत भोसले यांनी प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील वारस नोंदणीसंदर्भात महत्त्वाचे निवेदन त्यांच्याकडे सादर केले.

निवेदनात म्हटले आहे की, प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेअंतर्गत अनेक गरीब व गरजू कुटुंबांना गॅस कनेक्शनचा लाभ मिळाला आहे. मात्र, एखाद्या लाभार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू झाल्यानंतर त्याच्या नावावरील गॅस कनेक्शन पात्र कायदेशीर वारसाच्या नावे हस्तांतरित करताना अनेक कुटुंबांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

मयत लाभार्थ्याच्या कुटुंबातील पात्र वारसाच्या नावे गॅस कनेक्शन हस्तांतरित करण्यासाठी सुलभ, पारदर्शक व स्पष्ट प्रक्रिया उपलब्ध करून देणे आवश्यक आहे. त्यामुळे लाभार्थ्याच्या कुटुंबीयांना योजनेच्या सुविधेपासून वंचित राहावे लागणार नाही तसेच अनावश्यक प्रशासकीय त्रासालाही सामोरे जावे लागणार नाही. यासाठी संबंधित विभागाकडे योग्य तो पाठपुरावा करून आवश्यक सूचना देण्यात याव्यात, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली.

निवेदन प्राप्त झाल्यानंतर संतोष साखरे यांनी तातडीने प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून या प्रश्नाची माहिती दिली. त्यानंतर आ. चव्हाण यांनी तातडीने जिल्हा पुरवठा अधिकारी, सातारा यांच्या नावे पत्र काढून या विषयाबाबत शासनाकडे आवश्यक पत्रव्यवहार करण्याची विनंती केली.

प्रदेशाध्यक्ष आ. रविंद्र चव्हाण यांनी या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन केलेल्या पाठपुराव्यामुळे प्रधानमंत्री उज्ज्वला गॅस योजनेतील मयत लाभार्थ्यांच्या कनेक्शनच्या वारस हस्तांतरणाबाबत शासन स्तरावर सकारात्मक धोरणात्मक निर्णय होईल, अशी अपेक्षा भाजप सातारा जिल्हा उपाध्यक्ष विक्रांत भोसले यांनी व्यक्त केली.

यावेळी भाजप जिल्हा सरचिटणीस विकास गोसावी, विठ्ठल बलशेटवार, मनीषा पांडे, सोशल मीडिया प्रदेश प्रतिनिधी रविंद्र लाहोटी, शिक्षक आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अमोल कदम, पंढरपूर येथील शिक्षण संस्थाचालक प्रो. डॉ. पी. बी. रोंगे, प्रशांत चव्हाण आदी उपस्थित होते.


लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी 'सातारा टुडे' चे मोबाईल ॲप डाऊनलोड करा
मागील बातमी
मनीषा फडतरे यांचे कुणबी जात प्रमाणपत्र वैध; जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचा निर्णय
पुढील बातमी
सिंहस्थ कुंभमेळ्याच्या ध्वजारोहणात छत्रपती शिवरायांच्या पादुकांना मानाचे स्थान द्या; त्र्यंबकेश्‍वर देवस्थानच्या माजी विश्‍वस्त ललिता शिंदे-देशमुख यांची मागणी

संबंधित बातम्या