सातारा : जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीत नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप करत राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार गट) आणि शिंदेसेनेच्या सदस्यांनी विभागीय आयुक्तांकडे दाखल केलेल्या तक्रारीवर तब्बल दोन ते अडीच महिन्यांपासून सुनावणी झालेली नसल्याचा दावा करण्यात आला आहे. सुनावणी घेण्याची लेखी विनंती करूनही दखल घेतली जात नसल्याने आता या प्रकरणी उच्च न्यायालयात धाव घेणार, अशी माहिती तक्रारदारांचे वकील ऍड. दत्तात्रय घोडके यांनी पत्रकार परिषदेत दिली.
सातारा येथे आयोजित पत्रकार परिषदेत ऍड. घोडके बोलत होते. जिल्हा परिषद अध्यक्ष व उपाध्यक्षपदाची निवडणूक 20 मार्च रोजी झाली होती. या निवडणुकीत भाजपचे अध्यक्ष व उपाध्यक्ष विजयी झाले, तर राष्ट्रवादी कॉंग्रेस (अजित पवार) आणि शिंदेसेनेच्या उमेदवारांना पराभव पत्करावा लागला.
निवडणुकीतील नियमभंगाबाबत विभागीय आयुक्तांकडे तक्रार दाखल करण्यात आली आहे. या प्रकरणाची शेवटची सुनावणी सुमारे अडीच महिन्यांपूर्वी झाली होती. त्यानंतर एका महिन्यात पुढील सुनावणी घेण्याचे सांगण्यात आले होते. मात्र, अद्याप सुनावणीची तारीख मिळालेली नाही, असा दावा ऍड. घोडके यांनी केला.
पक्षकाराला न्याय मिळण्यासाठी सुनावणीची तारीख द्यावी, अशी मागणी करत दोन वेळा लेखी विनंती करण्यात आली. मात्र, त्यानंतरही सुनावणी झाली नसल्याने आता उच्च न्यायालयात दाद मागण्याचा निर्णय घेतल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
राष्ट्रवादी कॉंग्रेसमधून फुटलेल्या तीन सदस्यांविरोधातही जिल्हाधिकार्यांकडे सुनावणी सुरू असल्याचे ऍड. घोडके यांनी सांगितले. त्यामुळे जिल्हा परिषद अध्यक्ष-उपाध्यक्ष निवडणुकीपासून सुरू झालेला राजकीय व कायदेशीर संघर्ष अद्याप कायम असून, विभागीय आयुक्तांच्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.